रसिकांनी अनुभवल्या वेगळ्या वाटा

By Admin | Published: August 27, 2014 12:59 AM2014-08-27T00:59:56+5:302014-08-27T00:59:56+5:30

नेहमीच्या पद्धतीने सुरू असलेल्या जीवनाला कुठेतरी अचानक ब्रेक लागतो. आपण काय करतोय व काय करायचे आहे, या प्रश्नांमुळे वैचारिक संघर्षाची ठिणगी उडते. खरा प्रयत्न असतो तो दुसऱ्या

Different share of experiences experienced by the audience | रसिकांनी अनुभवल्या वेगळ्या वाटा

रसिकांनी अनुभवल्या वेगळ्या वाटा

googlenewsNext

संघर्षपूर्ण जीवन : चाकोरीबाहेर जगणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा परिचय
नागपूर : नेहमीच्या पद्धतीने सुरू असलेल्या जीवनाला कुठेतरी अचानक ब्रेक लागतो. आपण काय करतोय व काय करायचे आहे, या प्रश्नांमुळे वैचारिक संघर्षाची ठिणगी उडते. खरा प्रयत्न असतो तो दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा. चाकोरीबाहेर जाऊन जीवन जगणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग आलेले असतात. यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अंत:करणाने सुचविल्यामुळे वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या अशाच चार व्यक्तिमत्त्वांचे अनुभव ऐकण्याची संधी आज, मंगळवारी नागपूरकरांना मिळाली. ही चार व्यक्तिमत्त्वे स्वत:ही वेगळ्या वाटाच आहेत. या वाटा श्रोत्यांनी अनुभवल्या.
समाजसेवेचे व्रत घेतलेले दाम्पत्य डॉ. दिगंत व डॉ. अनघा आमटे, प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक व गुन्हेगारी मार्ग सोडून सत्कर्माचा प्रसार करणारे लक्ष्मण गोळे अशी या व्यक्तिमत्त्वांची नावे आहेत. सप्तक संस्था व छाया दीक्षित वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सोसायटी सभागृहात ‘वेगळ्या वाटा’ या शीर्षकाखाली त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गिरीश ओक व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा नाटकाशी तसुभरही संंबंध नाही. ते स्वत:ही वयाच्या १७ वर्षांपर्यंत नाटकाच्या संपर्कात आले नव्हते. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी नागपुरात रुग्णालय सुरू केले होते. यानंतर त्यांना वाटायला लागले की, हे आपले काम नाही. आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे. यामुळे ते अभिनय करायला मुंबईत गेले. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला.
ते ३० वर्षांपासून मुंबईत आहेत. परंतु अद्यापही मुंबईत रुजलो नसल्याचे सांगून नागपूर हेच आपले मूळ गाव असल्याचे मनापासून वाटते, असे ओक म्हणाले.
बाबा आमटे यांची समाजसेवा सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्यानंतरही हे व्रत आजतागायत टिकवून ठेवण्यात आमटे कुटुंबातील भावी पिढ्यांनी कुठलीच कमतरता ठेवलेली नाही. बाबा आमटे यांचे नातू डॉ. दिगंत यांचा या कार्यात मनोभावे सहभाग आहे. डॉ. अनघा यांनी लठ्ठ पगाराच्या संधी सोडून डॉ. दिगंत यांच्यासोबत विवाह केला व समाजसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले.
डॉ. अनघा यांच्यानुसार, पुणे येथील एका मॅरेज ब्युरोमुळे ते एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर डॉ. दिगंत यांनी संघर्षपूर्ण जीवनाची माहिती देऊनही डॉ. अनघा यांनी विवाहास होकार दिला. आदिवासींची भाषा आत्मसात करणे पहिले मोठे आव्हान होते, असे त्यांनी सांगितले. डॉ. दिगंत यांनी आदिवासी भागात गरिबीमुळे होणारे आजार सर्वाधिक असल्याचे व आदिवासी नागरिकांची सहनशिलता प्रचंड असल्याचे सांगितले.
मुंबई येथील लक्ष्मण गोळे सुरुवातीला कुख्यात गुन्हेगार होते. एक दिवस महात्मा गांधी यांचे ‘सत्याचे प्रयोग’ पुस्तक हातात आले आणि त्यांच्या जगण्याची वाटच बदलली. त्यांनी स्वत:च्या जीवनातही सत्याचे प्रयोग करण्याचा निश्चय केला. न्यायालयासमक्ष गुन्हे कबूल केले, शिक्षा भोगली. यानंतर कायदेशीर मार्गाने जीवन जगायला सुरुवात केली. ते आता इतर नागरिकांना सन्मार्गाने चालण्याचे मार्गदर्शन करतात. आजचे प्रतिष्ठापूर्ण जीवन घडविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी केले.(प्रतिनिधी)

Web Title: Different share of experiences experienced by the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.