खापा नगराध्यक्षांच्या अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:12 AM2021-02-28T04:12:34+5:302021-02-28T04:12:34+5:30
खापा : खापा नगर परिषदेच्या १२ नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत नगरविकास विभागाने नगराध्यक्षा प्रियंका मोहटे यांना कारणे दाखवा नोटीस ...
खापा : खापा नगर परिषदेच्या १२ नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत नगरविकास विभागाने नगराध्यक्षा प्रियंका मोहटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावत १५ दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नगराध्यक्षा मोहटे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत चौकशी करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. यात नगराध्यक्षा जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नगर परिषदेच्या कार्यालयात हजर राहत नाही. कोणतेही अधिकार नसताना नगराध्यक्षांचे पती न.प.च्या कार्यालयात विविध विभागात बसून असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.
यासोबतच पीठासीन अधिकारी म्हणून न.प.सभेचे कामकाज चालविणे व सभेतील चर्चेनुसार मुख्याध्याधिकाऱ्यांच्या मार्फत इतिवृत्त लिहिणे ही नगराध्यक्षांची जबाबदारी असताना जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या सभेच्या कामकाजाचे इतिवृत्त चर्चेनुसार लिहिले गेले नसल्याचे चौकशी दरम्यान आढळून आले आहे.
१५ फेब्रुवारी २०२० रोजी कंत्राटदार पीयूष बुरडे यांना काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात विशेष सभा बोलविण्याबाबत सदस्यांनी विनंती करूनही नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलविली नाही. मूळ बाजारपेठेच्या चौकात भरत असलेला बाजार हा गडेगाव रोडवरील आरक्षित जागेवर अद्यायावत स्वरुपात बांधण्याकरिता १ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आले. सदरचा बाजार स्थलांतरण करणे आवश्यक आहे. मात्र न.प. सभागृहाने याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. उपरोक्त बाबी या महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५५ (१) व ५५ अ,ब,चा भंग करणाऱ्या आहेत. त्यामुळे उपरोक्त तरतुदीनुसार नगराध्यक्षांना पदावरून दूर करून पुढील ६ वर्षाच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास किंवा स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अनर्ह का करण्यात येऊ नये अशी विचारणा या नोटीसद्वारे नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी प्रवीण पाटील यांनी नगराध्यक्षा मोहटे यांना केली आहे.