पॉलिमर दप्तराची खरेदी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:38+5:302021-09-02T04:15:38+5:30
नागपूर : शिक्षण विभागातर्फे पॉलिमर दप्तराची खरेदी करण्यात आली. परंतु, त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतल्याने दप्तराची खरेदीच अडचणीत आली आहे. ...
नागपूर : शिक्षण विभागातर्फे पॉलिमर दप्तराची खरेदी करण्यात आली. परंतु, त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतल्याने दप्तराची खरेदीच अडचणीत आली आहे. काँग्रेसच्या सदस्यांसोबत विरोधकांनीही दप्तर खरेदीच्या चौकशीची मागणी केल्याने सभापतींसह शिक्षणाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे आझे कमी करण्यासाठी पॉलिमर दप्तर खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी २.७५ कोटी रुपयांचा निधीही मिळाला. याकरिता आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, साहित्याचा पुरवठाही झाला आहे. या खरेदीवर काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. हा विषय शिक्षण समितीच्या बैठकीत आला नाही. नियमानुसार समितीमध्ये येणे आवश्यक असल्याचे म्हणत सर्वसाधारण सभेत सदस्यांनी खरेदीला स्थगिती देण्याची मागणी केली. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी या विषयाला स्थगिती देण्याचे निर्देश दिले. मात्र, साहित्य पुरविणाऱ्यास त्याचा मोबदला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. इतिवृत्त कायम होण्यापूर्वीच खरेदी करून मोबदला दिलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. याच्या खरेदीसोबत साहित्य शाळेत पोहोचण्याची माहिती सदस्यांना माहितीच नाही. त्यामुळे गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विरोधी पक्षानेही याच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे चौकशी झाल्यास शिक्षण विभाग व सभापती पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
- समितीपुढे हा विषय आलाच नाही. सभागृहात विषयाला मंजुरी मिळाली नाही. सदस्यांना माहिती नाही, अशी ओरड काँग्रेसचेच सदस्य करीत आहेत. त्यामुळे या दप्तर खरेदीत नक्कीच गोलमाल झाला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
व्यंकट कारेमोरे, उप गटनेते, विरोधी पक्ष, जि. प.