अनुदान न मिळाल्याने वॉटर हिटर्स वाटपात अडचण
By admin | Published: August 3, 2016 02:26 AM2016-08-03T02:26:47+5:302016-08-03T02:26:47+5:30
केंद्र सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अप्राप्त असल्याने लाभार्थींना ३४५० सोलर वॉटर हिटर्स
विद्युत विभागाचा आढावा : बंद पथदिवे सुरू करण्याचे निर्देश
नागपूर : केंद्र सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अप्राप्त असल्याने लाभार्थींना ३४५० सोलर वॉटर हिटर्स उपलब्ध करून देण्यात महापालिका प्रशासनापुढे अडचण निर्माण झाली आहे, अशी माहिती सोमवारी विद्युत विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आली.
महापालिकेच्या विद्युत विभागातील पथदिव्यांचा महापौर प्रवीण दटके यांनी स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत झोननिहाय आढावा घेतला. शहरातील बंद पथदिव्यांबाबत नाराजी व्यक्त करून ते तातडीने सुरू करा, शहरातील पथदिव्यांसंदर्भातील तक्रारी शून्यावर आणा, असे निर्देश त्यांनी दिले.
महापालिकेच्या विद्युत विभागातील पथदिव्यांची स्थिती, एलईडी प्रकल्प, वाहतूक सिग्नल, सोलर हिटर प्रकल्प, महापालिका इमारतीवरील सोलर यंत्रणा आदींचा आढावा घेण्यात आला.
महापालिक ा मुख्यालय व झोन कार्यालयांच्या इमारतीवर सोलर यंत्रणा बसविण्यात आल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांनी दिली. नागरिकांना १८१५ सोलर वॉटर हिटरचे वाटप करण्यात आले आहे. ९६० किलो वॅट क्षमतेचे सोलर ऊर्जा संयंत्र बसविण्यासाठी २. ३० कोटींचे अनुदान मंजूर आहे. यातील १.१५ कोटीचे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी स्थापत्य व विद्युत समितीचे सभापती सुनील अग्रवाल, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपर आयुक्त आर.झेड.सिद्दीकी, अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पथदिव्यांची स्थिती, एलईडी प्रकल्प, वाहतूक सिग्नल आदीची माहिती घेण्यात आली. पथदिवे सुरळीत सुरू ठेवा, तसेच दर महिन्याला सर्किटची तपासणी करण्यात यावी, असे निर्देश हर्डीकर यांनी दिले. (प्रतिनिधी)