नागपूर रेल्वेस्थानकासमोरील टेकडी फ्लायओव्हर ४५ महिन्यांनंतरही तोडण्यात अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 08:45 AM2022-06-23T08:45:00+5:302022-06-23T08:45:02+5:30
Nagpur News ४५ महिन्यांनंतरही गणेश टेकडी फ्लायओव्हर तोडण्यासाठी नागपूर महापालिकेला यश आले नाही. या उड्डाणपुलाखाली व्यवसाय करणाऱ्या १६० दुकानदारांपैकी ८० दुकानदारांनी सहमती दर्शविली आहे. तर उर्वरित न्यायालयात केले आहे.
राजीव सिंह
नागपूर : ४५ महिन्यांनंतरही गणेश टेकडी फ्लायओव्हर तोडण्यासाठी नागपूर महापालिकेला यश आले नाही. या उड्डाणपुलाखाली व्यवसाय करणाऱ्या १६० दुकानदारांपैकी ८० दुकानदारांनी सहमती दर्शविली आहे. तर उर्वरित न्यायालयात केले आहे. तर काहींनी मनपाच्या नोटिशीला उत्तर दिले नाही. हा उड्डाणपूल तोडून ६ लेनचा रस्ता बनणार होतो; पण दुकानदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कामाला कधी सुरुवात होईल यासंदर्भात मनपाचे अधिकारी कुठलीही डेडलाइन देण्यापासून वाचत आहे. विशेष म्हणजे प्रकल्पासाठी निधीची कुठलीही कमतरता नाही.
२९ सप्टेंबर २०१८ ला मनपाच्या सभेत गणेश टेकडी फ्लायओव्हर तोडून ६ लेनचा रस्ता बनविण्याचा निर्णय झाला होता. फ्लायओव्हरच्या खाली व्यवसाय करणाऱ्या १६० दुकानदारांना एमपी बसस्टॅण्ड परिसरात दुकान उपलब्ध करून देण्याचा पर्याय दिला होता. दुकान न घेणाऱ्यांना त्यांची अग्रीम रक्कम ८ टक्के व्याजासह परत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनपा बाजार विभागातर्फे काही दिवसांपूर्वी ड्रॉ काढून ५१ दुकानदारांना पर्यायी जागावर दुकान आवंटित करण्यात आले होते. तर २९ दुकानदार व्याजासह रक्कम घेण्यात तायर झाले होते. यातील १० दुकानदारांना अग्रीम रकमेचा चेक आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला होता. उर्वरित दुकानदारांची प्रक्रिया सुरू आहे.
विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ दुकानदारांनी मनपाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात तर १२ दुकानदारांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केले. तर ३५ दुकानदार सुनावणीसाठी हजर झाले; पण त्यांनी मनपाच्या नोटिशीला उत्तर दिले नाही. उर्वरित १४ दुकानदारांशी मनपाची चर्चा सुरू आहे. दुकानदारांकडून जागा खाली करण्यास विलंब होत असल्याने पूल तोडून ६ लेनचा रस्ता बनविण्यास बराच कालावधी लागू शकतो.
- सीआरएफ फंडातून मिळाले २३४.२१ कोटी
जयस्तंभ चौक ते मानस चौक व जयस्तंभ चौक ते श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स रस्त्यावरील वाहतुकीची समस्या निवारण्यासाठी रामझुला ते एलआयसी चौक व रिझर्व्ह बँकेपर्यंत फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. मात्र, रामझुलापासून लोहापूलदरम्यानचे ६ लेनच्या रस्त्याचे काम रखडले आहे. संबंधित प्रकल्पासाठी राष्ट्रीय सडक निधी (सीआरएफ) कडून २३४.२१ कोटी रुपये मिळाले आहे. महामेट्रो या प्रोजेक्टचे काम करीत आहे.
दुकानदारांना समाधानी करण्याचा प्रयत्न
मनपा उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की फ्लायओव्हरच्या जागी रस्ता बनविण्याच्या पूर्वी दुकानदारांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमानुसार दुकान अथवा अग्रीम रक्कम परत केली जात आहे. सर्वच दुकानदारांना समाधानी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही.
- दृष्टिक्षेपात
- ८१२ मीटर लांब व १०.५ मीटर रुंद या फ्लायओव्हरच्या बांधकामावर नागपूर महापालिकेने १६.२३ कोटी रुपये खर्च केले होते.
- रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागात २००८ मध्ये हा उड्डाण पूल तयार झाला होता. १७५ दुकाने व सुलभ शौचालय बनविण्यात आले होते. १६० दुकान ३० वर्षांसाठी लीजवर देण्यात आले होते.
- दुकानदारांकडून ११.९६ कोटी रुपयांची रक्कम अग्रीमच्या रूपात जमा करण्यात आली होती.