राज्यातील अवयवदान मोहिमेला आरटीओचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 09:51 AM2018-03-20T09:51:00+5:302018-03-20T09:51:13+5:30

आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता राज्य परिवहन विभागाने अवयवदानासंदर्भात राबविलेली मोहीम अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. त्यामुळे गडकरी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिवहन विभागाने कंबर कसणे तितकेच आवश्यक आहे.

Digging RTO for organ donation campaign in the state | राज्यातील अवयवदान मोहिमेला आरटीओचा खोडा

राज्यातील अवयवदान मोहिमेला आरटीओचा खोडा

googlenewsNext
ठळक मुद्देगडकरींचे स्वप्न कसे पूर्ण होणार ? अद्याप मोहीम बाल्यावस्थेतच,परवाना अर्जातील अवयवदानाच्या इच्छेकडे लक्ष वेधणे आवश्यक

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होतो. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नरत आहेतच. परंतु सोबतच मृत्यू पडलेल्यांच्या अवयवांचे निर्धारित वेळेत दान व्हावे, यासाठी गडकरी यांनी एक चांगली संकल्पना मांडली आहे. एखाद्या व्यक्तीला अवयवदान करावयाचे असल्यास तशी नोंद वाहन परवान्यातच केली जाईल, अशाप्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी रतन टाटा यांच्याशीदेखील बोलणी केली असून, त्यांचा सकारात्मक पुढाकार ऐतिहासिक व स्वागतार्ह ठरणार आहे. परंतु आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता राज्य परिवहन विभागाने अवयवदानासंदर्भात राबविलेली मोहीम अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. त्यामुळे गडकरी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिवहन विभागाने कंबर कसणे तितकेच आवश्यक आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाने यापूर्वीच तत्परता दाखविली असती तर परवान्याच्या माध्यमातून मोठ्या संख्येत लोकांना अवयवदान करणे शक्य झाले असते. राज्य परिवहन विभागाने २०१३ पासून अवयवदानाची मोहीम हाती घेतली, मात्र ती जबाबदारीपूर्वक राबविण्यात आली नसल्याने आजही ती बाल्यावस्थेतच आहे. विशेष म्हणजे, वाहन परवानाच्या आॅनलाईन अर्जात ‘अपघाती मृत्यू झाल्यास मी माझे अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त करतो’ असे शपथपत्र दिले आहे. मात्र, बहुसंख्य अर्जदार याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे वास्तव आहे.

राज्यात वर्षभरात दिले ३१ लाख ६५ हजार परवाने
४परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या ५० आरटीओ कार्यालयांमधून रोज साधारण सात ते आठ हजार शिकाऊ वाहन परवाने दिले जातात. एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत २० लाख ९५ हजार ८८९ शिकाऊ परवाने देण्यात आले, तर याच कालावधीत १० लाख ६९ हजार २१६ पक्के परवाने देण्यात आले. या दोन्ही परवान्यांची बेरीज ३१ लाख ६५ हजारावर जाते. परवान्याच्या अर्जात अवयवदान करण्यास इच्छुक आहात किंवा नाही, अशी अट टाकल्यास व परवान्यावर तशी नोंद घेतल्यास अवयवदानाच्या चळवळीला गती देणे सहज शक्य आहे.

पाच लाख रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत
४भारतात हजारो लोक अवयवदानासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. सद्यस्थितीत देशभरात सुमारे पाच लाख रुग्ण मूत्रपिंड, ५० हजार रुग्ण यकृत आणि दोन हजाराहून अधिक रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे शासनाकडून अवयवदान चळवळीची व्यापक जनजागृती व चोख व्यवस्थापन होणे महत्त्वाचे झाले आहे.

२०१३ मध्ये सुरू झालेली योजना पडली बंद
राज्य परिवहन विभागाने २०१३ मध्ये नवीन वाहन परवाना काढताना उमेदवाराला ‘आरटीओ’ कार्यालयात अवयवदानाची शपथ देण्याचे, अवयवदान करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून तसा अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. याची सुरुवात मुंबईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) होऊन सर्व कार्यालयांमध्ये सुरू झाली. परंतु अर्ज भरण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू होताच ही मोहिमच बंद पडली.


एक ब्रेनडेड व्यक्ती १० रुग्णाला जीवनदान देऊ शकते
मेंदूमृत दात्याला हृदय, हृदयाच्या झडपा, फफ्फुस, मूत्रपिंड, त्वचा, डोळे, यकृत, स्वादूपिंड, आतडी, कानाचे ड्रम आदी अवयवदान करता येतात. यामुळे एक मेंदूमृत व्यक्ती साधारण १० रुग्णांना जीवनदान देऊ शकतो. यामुळे मृत्यूनंतर चिमूटभर राख होऊन संपून जाण्यापेक्षा, एका जीवनज्योतीने दुसरी ज्योत तेवत राहण्यास मदत करणे, हे महान कार्य आहे. यात प्रत्येकाने समोर यायला हवे.
-डॉ. मकरंद व्यवहारे
विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग


एक टक्काही मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाल्यास प्रतीक्षाच संपेल
लोकसंख्येत चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. परंतु अवयवदानात स्पेन आणि कुएशियासारख्या लहान देशांच्या तुलनेत भारत कुठेही नाही. स्पेनमध्ये प्रत्येक १० लाख लोकसंख्येमागे एक मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान होत असून याचा टक्का ३५ टक्के आहे. भारतात मात्र ४० लाख लोकसंख्येमागे एकच अवयवदान होते. भारतात अपघाताच्या मृत्यूचा आकडा मोठा आहे. यातील एक टक्काही मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान झाल्यास अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अवयव मिळू शकतील.
-डॉ. रवी वानखेडे
सचिव, विभागीय प्रत्यारोपण समिती


वर्षाला ५०० हून अधिक ब्रेनडेड रुग्ण
४इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वर्षाला सुमारे १८०० शवविच्छेदन होतात. यातील साधारण ५०० वर रुग्ण ‘ब्रेनडेड’ असतात. यामुळे आधीच अवयवदानाची इच्छा व्यक्त झाल्यास व परवान्यासारख्या शासकीय कागदपत्रावर तशी नोंद राहिल्यास मोठ्या संख्येत अवयवदान होऊ शकेल, अशी माहिती न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी दिली.


आरटीओचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने होण्यासाठी आणि उमेदवारांच्या सोयीसाठी राज्यभरात शिकाऊ व पक्क्या वाहन परवान्यासाठी आनॅलाईन अर्ज भरून ‘अपॉर्इंटमेंट’ घेण्याची योजना २०१४ पासून सक्तीची केली. या अर्जातच अवयवदानाचे शपथपत्र दिले आहे. यात अर्जदाराची इच्छा असेल तर ‘टीक’ करावे, अशी सूचना आहे. परंतु तसे नाही केले तरी अर्जदाराला समोर जाता येते. यामुळे त्याकडे कुणीच पाहत नाही. महत्त्वाचे म्हणजे, यासंदर्भात परिवहन विभागाकडे किती जणांनी आपली इच्छा व्यक्त केली याचीही नोंद नाही. परिवहन विभागाने अवयवदानाच्या इच्छेला ‘हो’ किंवा ‘नाही’ या अटीवर ठेवल्यास व ‘क्लिक’ न करता समोर जाता येणार नाही अशी व्यवस्था केल्यास अवयवदानाची माहिती उमेदवारांपर्यंत पोहचेल.

Web Title: Digging RTO for organ donation campaign in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.