‘डिजिटल डिव्हाईस’ मुलांच्या वागणुकीत बाधा : डॉ. छाया प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 08:05 PM2018-01-05T20:05:00+5:302018-01-05T20:18:55+5:30
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट अॅण्ड बिहेव्हियरल पेडियाट्रिशयन’ तज्ज्ञ डॉ. छाया प्रसाद यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : १८ महिन्यांचे बाळ होईपर्यंत घरातील टीव्ही, मोबाईल, संगणक सर्व बंद असायला हवे. १८ ते ३ वर्षांच्या बाळाला दिवसातून केवळ १५ ते २० मिनिटे त्याच्या स्तरावरील व त्याला आवडेल असे ‘कॉर्टून शो’ किंवा चित्र किंवा गाणी दाखविता येईल. परंतु सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट अॅण्ड बिहेव्हियरल पेडियाट्रिशयन’ तज्ज्ञ डॉ. छाया प्रसाद यांनी दिली.
चंदीगड येथील डॉ. प्रसाद या भारतीय बालरोग परिषद नागपूर शाखेच्या यजमान पदाखाली आयोजित ५५व्या भारतीय बालरोग परिषद ‘पेडिकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाल्या आहेत. शुक्रवारी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
डॉ. प्रसाद म्हणाल्या, पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत घरात दोनपेक्षा जास्त माणसे राहायची. ती लहान बाळांशी खेळायची, त्यांच्याशी बोलायची. यामुळे लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ चांगल्या पद्धतीने व्हायची. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती असल्याने त्यातही आई-वडील दोन्ही नोकरी करीत असल्याने बाळाला पाळणाघरात किंवा एखाद्या बाईकडे सोपविले जाते. परिणामी, बाळाशी संवाद कमी होतो. त्याच्या ‘डेव्हल्पमेंट’वर प्रभाव पडतो. साधारण १० टक्के मुलांचा विकास यामुळे खुंटतो.
दोन-चार महिन्यांचे बाळ हसत नसेल तर गंभीरतेने घ्या
डॉ. प्रसाद म्हणाल्या, बाळाची योग्य वाढ होत आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काही लक्षणे आहेत. जसे, दोन-चार महिन्यांचे बाळ आईला पाहून हसत नसेल, त्याला आपली मान सांभाळता येत नसेल, आठ महिन्यांचा होईपर्यंत तो बसत नसेल, १०-११ महिन्यापर्यंत रांगता येत नसेल, एक वर्षापर्यंत आई-बाबा, मम्मी-पप्पा, किंवा दादा-दादी असे शब्द उच्चारता येत नसतील आणि १६ महिन्यापर्यंत तो चालू शकत नसेल तर या सर्व बाबी गंभीर आहेत. आई-वडिलांनी वेळीच ही लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रांगणे हे मेंदूच्या वाढीसाठी महत्त्वाचे
साधारण १० ते ११ महिन्यांची मुले रांगायला पाहतात किंवा रांगतात. परंतु अनेक आई-वडील बाळाला लागेल किंवा फरशी घाण आहे किंवा इतर कारणाने त्याला रांगू देत नाही. परंतु मानसिक विकासासाठी बाळाला रांगू देणे फार महत्त्वाचे आहे. कारण, तो रांगताना एक हात आणि पाय समोर तर दुसरा हात आणि पाय मागे घेतो, मेंदूसाठी ही क्रिया महत्त्वाची ठरते.
मुलांना मोकळे खेळू द्या
मुलांच्या वाढीसाठी त्याचे मनमोकळे खेळणे महत्त्वाचे आहे. कारण खेळताना त्याची पाच इंद्रिय सक्रिय होतात. जी त्याच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरतात. यामुळे रोज एक तास मुलांनी खेळायला हवे. याशिवाय पालकांनी ‘ओव्हर प्रोटेक्ट’ नसायला हवे, असा सल्लाही डॉ. प्रसाद यांनी दिला.
मेंदू विकासासाठी साडीच्या पाळण्याची होते मदत
साडीच्या पाळण्यात लहान मुलांना दुपारच्यावेळी झोपवले किंवा ठेवले तर त्याच्या मेंदूचा विकास होतो, हे एका संशोधनातून सामोर आले आहे. या सोबतच तान्ह्या बाळासोबत त्याच्या नजरेला नजर भिडवून संवाद साधल्यास, त्याला झोपविताना गाणी म्हटल्यास मुलाची मानसिक वाढ चांगली होते, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले.