नागपूर एसटीकडून डिजिटल इंडियाला वाकुल्या; रोख पैसे असतील तरच चढता येणार पायरी
By नरेश डोंगरे | Published: September 11, 2022 05:49 PM2022-09-11T17:49:04+5:302022-09-11T17:49:57+5:30
नागपूर एसटीकडून डिजिटल इंडियाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नागपूर: महानगरांसोबत छोट्या-छोट्या खेड्यात दिमाखाने धावणारी, महाराष्ट्राच्या नागरिकांची लाडकी लालपरी ७५ वर्षांची झाली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांत वाटचाल करणाऱ्या लालपरीने वेगवेगळ्या नावाने अनेकदा स्वतात बदल करून घेतले असले तरी एसटीने डिजिटल इंडियाला मात्र अद्याप थारा दिला नाही. कॅशलेस पेमेंटला एसटी वाकुल्या दाखवत फिरत आहे. रोख पैसे असेल तरच पायरी चढा, अशी आजही एसटीची भूमिका आहे. नोटबंदी अन् नवे चलन येण्याची प्रक्रिया देशात सुरू झाल्यापासून डिजिटल इंडियाचा नारा देशभर बुलंद झाला. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक विभागात कॅशलेस व्यवहाराला सुरूवात झाली. शहरांमध्येच नव्हे तर गावखेड्यातही मोठमोठे, बहुतांश व्यवहार कॅशलेस होऊ लागले. कुठे १० रुपयांचा चहाही घ्यायचा असेल तर कॅशलेसची सुविधा मिळते.
विमानापासून, टॅक्सीपर्यंत गुगल पे, फोन पे करा अन् प्रवास करा, अशी सुविधा उपलब्ध झाली. ऑटोवालेही ग्राहकांसमोर गुगल, फोन पे चे पर्याय देतात. एसटी महामंडळ मात्र अजूनही डिजिटल इंडियाला वाकुल्या दाखवत आहे. येथे गुगल, फोन पे तर सोडाच कोणते कार्डही स्वॅप होत नाही. बसमध्ये प्रवास करायचा असेल तर रोख रकमेशिवाय पर्याय नाही. रोख पैसे द्या अन् एसटीत या असा सरळ सरळ हिशेब एसटीने ठेवला आहे.
अनेकदा बदलले रूप
राज्यातील ९२ टक्के गावात लालपरी पोहचली आहे. उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा, ती १२ महिने तेवढ्याच उत्साहाने धावते. प्रवाशांची ने-आण करण्यासाठी अहोरात्र सज्ज असते. गेल्या काही वर्षांत तिने पारंपारिकता जोपासताना अनेकदा कात टाकून आपले रुपडे बदलले आहे. त्याचाच भाग म्हणून कधी ती एशियाड झाली. कधी शिवनेरी तर कधी शिवशाही बनली. आता अत्याधुनिक अशा शिवाईच्या रुपातही धावत आहे.
पेमेंट ऑप्शनबाबत 'तोच तो पणा'
प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या एसटी महामंडळाने पेमेंट ऑप्शनच्या बाबतीत मात्र 'तोच तो पणा' अवलंबला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी एसटीकडे पाठ फिरवत आहेत. या संबंधाने एसटीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता लवकरच कॅशलेसचे ऑप्शन उपलब्ध होणार असल्याचे अधिकारी सांगतात.