नागपुरात कोविड रुग्णांशी आता डिजिटल संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:04 PM2020-06-20T12:04:29+5:302020-06-20T12:06:34+5:30
नागपुरात कोविड रुग्णांशी डिजिटल संवाद साधण्यासाठी ‘टेलिमेडिसीन’ मदत घेतली आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आता वरिष्ठ डॉक्टरच त्यांच्या सेवेत असणार आहेत. यासाठी प्रत्येक वेळी वरिष्ठ डॉक्टरांना त्यांच्या जवळ न जाताही त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या पुढाकाराने हे शक्य होऊ शकले आहे. त्यांनी कोविड रुग्णांशी डिजिटल संवाद साधण्यासाठी ‘टेलिमेडिसीन’ मदत घेतली आहे. याचा फायदाही होताना दिसून येत आहे.
तीन मजल्याच्या ट्रॉमा केअर सेंटरला कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. येथे २०० खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) तर ४०० खाटांचे ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) आहे. सध्या १५०वर रुग्ण उपचार घेत आहेत. मेडिकल इमारतीपासून ही इमारत वेगळी आहे. येथे सहायक प्राध्यापक व निवासी डॉक्टर चोवीस तास कार्यरत असतात. त्यांच्या मदतीला सहयोगी व प्राध्यापक डॉक्टर असतात.
परंतु वॉर्डात राऊंड घेताना चार-पाच डॉक्टर, परिचारिका यांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होत नाही. कोविड वॉर्डात अशीही गर्दी करणे धोकादायक ठरू शकते. शिवाय, काही वरिष्ठ डॉक्टरांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार आहे.
त्यांचेही वारंवार वॉर्डात जाणे टाळण्यासाठी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी डिजिटल संवाद साधण्याची भूमिका मांडली. त्याला त्यांनी मूर्त स्वरूपही दिले. यामुळे एका कक्षात बसून कोविड वॉर्डातील रुग्णांशी थेट संवाद साधणे वरिष्ठ डॉक्टरांना शक्य झाले आहे.
असा साधला जातो संवाद
एक ट्रॉलीमध्ये लॅपटॉप बसविण्यात आला आहे. त्याला अधिष्ठाता कक्षातील अत्याधुनिक संगणकाशी जोडण्यात आले आहे. वॉर्डातील डॉक्टर कर्मचाऱ्याच्या मदतीने प्रत्येक रुग्णासमोर ट्रॉली घेऊन जाईल. लॅपटॉपमधून वरिष्ठ डॉक्टर रुग्णांशी संपर्क साधतील. रुग्णाला डॉक्टर तर डॉक्टरला रुग्ण दिसेल. दोघांमध्ये संवाद निर्माण होईल. उपचारात काही बदल करायचे असल्यास त्याचवेळी वरिष्ठ डॉक्टर तेथील डॉक्टरांना सूचना देऊ शकतील. या डिजिटल संवादाची एक स्क्रीन अधिष्ठाता कक्षातही असेल. यामुळे तेही रुग्णांसोबतच उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधू शकतील.