नागपूर रेल्वेस्थानकावर मिळणार डिजिटल लॉकरची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 08:00 AM2022-10-12T08:00:00+5:302022-10-12T08:00:01+5:30
Nagpur News ठिकठिकाणच्या हजारो प्रवाशांचे जाणे - येणे असलेल्या येथील मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर लवकरच डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नरेश डोंगरे !
नागपूर : ठिकठिकाणच्या हजारो प्रवाशांचे जाणे - येणे असलेल्या येथील मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर लवकरच डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेमुळे औटघटकेसाठी नागपुरात येणाऱ्या हजारो प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
देशाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या विविध भागातील रेल्वेगाड्या जात येत असतात. त्यामुळे येथे रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यातील काही प्रवासी व्यवसाय, नोकरी, खरेदीच्या निमित्ताने येथे येतात. त्यामुळे त्यांचा नागपुरातील मुक्काम औटघटकेचा असतो. काम झाले की ते येथून लगेच निघून जातात. त्यांच्यापैकी अनेकजण येथे मोठे सामान घेऊन येतात किंवा येथून सामान खरेदी करून दुसऱ्या ठिकाणी जातात. काही वेळच नागपुरात थांबायचे असले तरी रेल्वेगाडीच्या वेळा लक्षात घेता हे सामान त्यांना हॉटेल किंवा लॉजमध्ये ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक फटका बसतो. कारण काही तासांसाठी जरी थांबतो म्हटले तरी हॉटेल किंवा लॉजमध्ये त्यांना पूर्ण दिवसांचे भाडे द्यावे लागते. त्यामुळे आर्थिक फटका सहन करा किंवा ते सामान घेऊन सोबत फिरा, हाच पर्याय त्यांच्यापुढे असतो. सामान घेऊन फिरणे संबंधित प्रवाशांसाठी प्रचंड त्रासदायक असते. हा एकूणच प्रकार लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर डिजिटल लॉकरची सुविधा सुरू करण्याची कल्पना आणली आहे. ही सुविधा सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार आहे. ते आपले सामान लॉकरमध्ये ठेवून विशिष्ट अवधीसाठी बाहेर जाऊ शकतील.
कुठे लावायचे लॉकर ?
लॉकरची सुविधा सुरू करायची हे निश्चित झाले असले, तरी ती सुविधा पूर्वेकडे की पश्चिमेच्या बाजुने सुरू करावी, हे अद्याप निश्चित झाले नाही. त्यासंबंधाने दोन्ही प्रवेशद्वाराच्या पर्यायावर वरिष्ठ अधिकारी विचार करीत आहेत.
लवकरच निर्णय
या संबंधाने वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. एकदा जागा निश्चित झाली की लॉकर उभारणीला फारसा वेळ लागणार नाही, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विजयकुमार थुल यांनी दिली आहे.
----