डिजिटल ‘सातबारा’चे वाजले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:23+5:302021-01-20T04:09:23+5:30
अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : शेतजमीन खरेदी-विक्री, बँक कर्ज, कार्यालयीन कामकाज आदी महत्त्वपूर्ण बाबींसाठी अत्यंत मौलिक ...
अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : शेतजमीन खरेदी-विक्री, बँक कर्ज, कार्यालयीन कामकाज आदी महत्त्वपूर्ण बाबींसाठी अत्यंत मौलिक असलेले सात-बारा, ८-अ, फेरफार या दस्तऐवजांसाठी उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे सतरा चकरा घालाव्या लागत आहेत. सुमारे दोन आठवड्यांपासून असंख्य तलाठी साझांमध्ये डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) कंत्राटाची मुदत संपल्याने डिजिटल सात-बाराचे बाराच वाजल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
उमरेड तालुक्यातील बेला, पाचगाव, सायकी, किन्हाळा, डव्हा, ठाणा, हेवती, आपतूर, चनोडा आदी साझांमधील असंख्य गावांमध्ये डिजिटल सात-बारा मिळणे तूर्त बंद झाले. दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपासून ही समस्या या साझांमध्ये आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पन्नासवर गावांमध्ये भेडसावत आहे. पूर्वी ई-मुद्रा या कंपनीकडे तलाठी, मंडळ अधिकारी डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया करीत होते. यावर्षी हे कंत्राट सी.झेड. टेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. दुसरीकडे, सरत्या वर्षात ३१ डिसेंबरपासून अनेकांची डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपलेली आहे. उमरेड सर्कलमधील मुदतसुद्धा येत्या दोन दिवसांत संपण्याच्या मार्गावर आहे. यामुळे तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक गावांमधील या समस्येत आणखीनच भर पडणार आहे.
याबाबत नायब तहसीलदार मदन जोगदंड यांच्याशी चर्चा केली असता, नवीन कंपनीला केवळ दोन दिवसांपूर्वीच डिजिटल स्वाक्षरीबाबतचे कंत्राट मिळाले असून, नवीन नियमावलींची त्यात भर पडली आहे. ही समस्या उद्भवल्यानंतर ३१ डिसेंबरपासून ग्रामपंचायत निवडणुकांमुळे या कामास थोडा विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीतही तहसील कार्यालयात, सेतुमध्ये आम्ही ऑनलाईन सात-बारा उपलब्ध करून देऊ, अशीही बाब त्यांनी व्यक्त केली.
उमरेड तालुक्यात एकूण ३५ तलाठी असून, १६ तलाठ्यांनी डीएससी प्रक्रियेसाठी अर्ज सादर केले आहेत. 'महाभूलेख' या खासगी साईटवर उपलब्ध असलेला सातबारा खरेदी-विक्री, कर्ज व अन्य कार्यालयीन कामकाजासाठी उपयोगी ठरत नसल्याने तातडीने ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
....
दोन वर्षासाठी ‘डीएससी’
तलाठ्यांच्या माध्यमातून संबंधित कंत्राटी कंपनीकडे डिएससी (डिजिटल सिग्नीचर सर्टिफिकेट) ची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया आटोपली की मग संबंधित तलाठ्यास कोड नंबर दिला जातो. त्यानंतर मग संगणकाच्या माध्यमातून संबंधित तलाठी शेतकऱ्यांना सही, शिक्यासह साक्षांकित केलेले दस्ताऐवज देतो. ही प्रत खरेदी-विक्री, कर्ज अन्य कार्यालयीन कामकाजासाठी योग्य ठरत असते. आता असंख्य तलाठ्यांच्या डीएससीची मुदत संपल्याने ही अडचण उद्भवली आहे. सदर डीएससीचा कालावधी दोन वर्षाचा असतो.