परीक्षा विभागातील दस्तावेज होणार ‘डिजिटल’
By admin | Published: September 24, 2015 03:26 AM2015-09-24T03:26:40+5:302015-09-24T03:26:40+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विभागाच्या ‘रेकॉर्ड’ रूममध्ये गेल्यावर दिसते ती धूळ लागलेली कागदपत्रे व फायलींचे गठ्ठे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विभागाच्या ‘रेकॉर्ड’ रूममध्ये गेल्यावर दिसते ती धूळ लागलेली कागदपत्रे व फायलींचे गठ्ठे. अनेक महत्त्वाचे दस्तावेज यामुळे खराब होण्याचीदेखील शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन परीक्षा विभागातील दस्तावेजांना ‘डिजिटल’ स्वरूप देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. लवकरच परीक्षा विभागात अद्ययावत ‘डेटा सेंटर’ उभारण्यात येणार आहे.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात कित्येक वर्षांपासूनचे निकाल व महत्त्वाचे दस्तावेज आहेत. सर्व दस्तावेज हे कागदपत्रांच्या स्वरूपात आहेत. धूळ, उधई तसेच पाणी अन् कीटकांमुळे ही कागदपत्रे खराब होण्याचा धोका असतो. शिवाय विद्यापीठाचा कारभार मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. अशा स्थितीत दरवर्षी ‘रेकॉर्ड’मध्ये नवीन दस्तावेजांची भरच पडते.
‘रेकॉर्डरुम’मध्ये तर आता फाईल्स ठेवायला देखील जागा राहिलेली नसून कर्मचाऱ्यांना ढिगातच काम करावे लागत आहे. शिवाय ‘आयटी रिफॉर्म्स’ करण्याचे विद्यापीठाला निर्देश आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी ‘आॅनलाईन’ पद्धतीने सुरू आहे. परंतु हा ‘डेटा’ ‘एमकेसीएल’कडे आहे. प्रत्येक वेळी ‘डेटा’ हवा असल्यास अधिकाऱ्यांना ‘एमकेसीएल’कडेच विचारणा करावी लागते. या सर्व बाबी लक्षात घेऊन विद्यापीठाने स्वत:चे ‘डेटा सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)