डिक्की तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:01+5:302021-01-25T04:10:01+5:30
- डिक्की विदर्भ शाखेची नवीन कार्यकारिणी : गोपाल वासनिक यांची अध्यक्षपदी फेरनिवड नागपूर : दलित इंडियन चेंबर ऑफ ...
- डिक्की विदर्भ शाखेची नवीन कार्यकारिणी : गोपाल वासनिक यांची अध्यक्षपदी फेरनिवड
नागपूर : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या (डिक्की) विदर्भ शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी गोपाल वासनिक आणि उपाध्यक्षपदी राजेश दवंडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. डिक्की महाराष्ट्रचे अध्यक्ष व पश्चिम भारताचे समन्वयक संतोष कांबले यांनी कार्यकारिणी जाहीर केली.
पश्चिम भारताचे बँकिंगविषयक प्रमुख विजय सोमकुंवर यांना कमिटीमध्ये विशेष स्थान देण्यात आले असून कोर कमिटी सदस्य रामदास टेकाम, गौतम सोनटक्के, श्रद्धानंद गणवीर, मंगेश डोंगरवार, राजरतन मेंढे, विनोद मेश्राम यांची विविध व्हर्टिकल प्रमुखपदी तर महिला विंग समिती समन्वयक म्हणून श्वेता भालेराव, प्रज्ञा सोमकुंवर, अरुणा किरणापुरे, चेतना वाघमारे यांची निवड करण्यात आली.
गोपाल वासनिक यांनी पुढील वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कोरोना संकटामुळे सर्वच व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून संकटातून बाहेर येण्यासाठी डिक्की सर्व सदस्य व्यावसायिकांच्या पाठीशी आहे. सदस्यांना योग्य ती मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संतोष कांबले म्हणाले, डिक्की अनुसूचित जाती व जमातीतील तरुणांना व्यवसाय क्षेत्रात प्रोत्साहित करण्यासाठी गेली १५ वर्षे सक्रियपणे कार्यरत आहे. तरुणांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी देश आणि राज्यातील सर्वच मोठ्या शहरात व्यवसाय सुविधा केंद्र सुरू करणार आहेत. याद्वारे देशातील ५ हजार तरुण आणि ५ हजार महिलांना स्टार्टअप निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमात डिक्की विदर्भ शाखेचे अध्यक्ष गोपाल वासनिक, पश्चिम भारताचे बँकिंगविषयक प्रमुख विजय सोमकुंवर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश दवंडे, नाबार्डचे निवृत्त सहायक महाव्यवस्थापक सुभाष बोंदाडे, डिक्की मुंबईचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुगत वाघमारे, प्रदीप मेश्राम, डॉ. वानखेडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.