दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणात २३ जणांवर गुन्हा दाखल, महिला पोलिसाला धक्काबुक्की-शिवीगाळ केल्याचा ठपका

By योगेश पांडे | Published: July 4, 2024 01:33 AM2024-07-04T01:33:09+5:302024-07-04T01:33:41+5:30

बजाजनगर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

Dikshabhoomi case A case has been registered against 23 people accused of assaulting and abusing a woman police officer | दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणात २३ जणांवर गुन्हा दाखल, महिला पोलिसाला धक्काबुक्की-शिवीगाळ केल्याचा ठपका

प्रतिकात्मक फोटो...

नागपूर : भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला विरोधावरून १ जुलै रोजी दीक्षाभूमी परिसरात झालेल्या आंदोलनावर राजकारण तापले असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. बजाजनगर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात २३ आंदोलनकर्त्यांची नावे आहेत. गुन्हे दाखल असलेल्यांनी बेकायदेशीरपणे एकत्र येत जमावाला भडकावले, तसेच पोलिसांना शिवीगाळ केली. याशिवाय महिला पोलिसाला खाली पाडत धक्काबुक्की केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

पार्किंगच्या बांधकामाला विरोध असल्याने हजारो आंबेडकरी अनुयायांनी एकत्रित येत आंदोलन केले. त्यांनी बांधकाम बंद पाडले व यादरम्यान विकासकामांच्या साहित्याची तोडफोड झाली. दीक्षाभूमी परिसरात जाळपोळ देखील झाली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. आंदोलनानंतर दोन दिवसांपासून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर बजाजनगर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. पहिला गुन्हा एका पोलिस शिपायाच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला. या तक्रारीच्या अनुषंगाने सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १२५, १३२, १८९(२), १८९(५),१९०, १९१ (२), २९६, ३२६(एफ), ३२६(जी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे आंदोलन करत विकासकामाच्या साहित्याची तोडफोड करणे, मजुरांच्या झोपड्यांची जाळपोळ करणे, आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अडविणे, इतरांना चक्काजाम करण्यासाठी प्रवृत्त करणे, पोलिसांना शिवीगाळ करणे यासाठी १६ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. यात पद्माकर गणवीर, रवी शेंडे, विजय पाटील, धम्मानंद मनवर, रोहित नागोजी राऊत, अनिल पखिड्डे, विलासचण भेसारे, विशाल वानखेडे, हर्षवर्धन गोडघाटे, हरीष पाटील, पुरुषोत्तम पाटील, वैशाली गोस्वामी, माया उईके, दोन अज्ञात महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.

दुसरा गुन्हा एका महिला पोलिस शिपायाच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला. ही महिला पोलिस नीरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तैनात होती. त्या मार्गावरून जेसीबी येत असल्याने आंदोलनकर्त्यांनी तिकडे धाव घेतली व चालकाला ती समोर नेण्यास भाग पाडले. त्यामुळे जेसीबी पोलिसांच्या अंगावर येत होती. एका महिलेने आंदोलनकर्त्यांना उकसावण्यासाठी नारे दिले व तिने आरसीपीच्या एका महिला पोलिस शिपायाचे केस ओढून खाली पाडले व धक्काबुक्की केली, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हा गुन्हा महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१-१३५, तसेच भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १२१(१), १२५, १२६(२), १३२, १८९(१),१८९(२), १८९(३) व १८९(४) अंतर्गत नोंदविण्यात आला. यात प्रतीक्षा मेश्राम, रोहित नाजोकराव राऊत, जगदीश रामदास डवरे, हर्षा वामनराव दमके, राहुल तामगाडळे, एक महिला व एका पुरुष यांचा समावेश आहे.

Web Title: Dikshabhoomi case A case has been registered against 23 people accused of assaulting and abusing a woman police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.