दीक्षाभूमीवर एक वही एक पेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:28 AM2018-10-17T00:28:37+5:302018-10-17T00:30:01+5:30
दीक्षाभूमीवर येताना मेणबत्ती आणि पुष्प आणण्यापेक्षा एक वही आणि एक पेन घेऊन या. यामुळे समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, हा संदेश देत ‘एक वही एक पेन’ हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या काळात दीक्षाभूमीवर राबविला जातो. यावर्षीही प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने हा उपक्रम दीक्षाभूमीवर राबविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षाभूमीवर येताना मेणबत्ती आणि पुष्प आणण्यापेक्षा एक वही आणि एक पेन घेऊन या. यामुळे समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, हा संदेश देत ‘एक वही एक पेन’ हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या काळात दीक्षाभूमीवर राबविला जातो. यावर्षीही प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने हा उपक्रम दीक्षाभूमीवर राबविला जाणार आहे.
संस्थेतर्फे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हा स्टॉल लावण्यात येणार आहे. दरवर्षी दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांकडून या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत असून प्रत्येक वर्षी हजारो वह्या आणि पेन या उपक्रमातून गोळा करून विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातात. दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी जाताना मेणबत्ती, अगरबत्ती आणि पुष्प अर्पण करण्याची इच्छा अनेकांची असते. मात्र सर्व साहित्य पुढे कचरा रुपाने फेकण्यात जाते. त्यामुळे या साहित्याऐवजी वही आणि पेन आणल्यास ते गरजू मुलांच्या उपयोगात येऊ शकते, हा प्रचार तरुणांकडून करण्यात आला आणि या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले. त्यामुळे या उपक्रमाला व्यापक रुप आले आहे. यावर्षीही उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास संस्थेचे अनिकेत कुत्तरमारे यांनी व्यक्त केला. या उपक्रमाशिवाय संस्थेतर्फे दुसरा एका स्टॉलवर मेडिकल हेल्थ कॅम्प व सॅनिटरी नॅपकीनचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपक्रमात शिरीष फुलझेले, डॉ. पंकज वासनिक, शीतल गडलिंग, स्वप्नील निखाडे, सिद्धांत पाटील, नीलेश बागडे आदींचा सहभाग राहील.