दीक्षाभूमीला पुन्हा मिळाले ७० कोटी रूपये, २१४ कोटीचा विकास आराखडा
By आनंद डेकाटे | Published: July 28, 2023 06:32 PM2023-07-28T18:32:07+5:302023-07-28T18:32:26+5:30
विकास कामाला पावसाळ्यानंत सुरुवात
नागपूर :दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने पुन्हा ७० कोटी रूपये प्रदान केले आहे. यापूर्वी ४० कोटी रूपये नासुप्रकडे जमा आहे, असे एकूण ११० कोटी रूपये जमा झाले असून लवकरच कामाला सुरूवात केली जाणार आहे.
दीक्षाभूमीचा विकास हा जागतिक दर्जानुसार करण्यासाठी राज्य शासनाने नवीन विकास आराखडा तयार केला आहे.
एकूण २१४ कोटी रूपयाचा हा विकास आराखडा आहे. काही वर्षांपूर्वीच ४० कोटी रूपयाचा पहिला हप्ता हा नासुप्रकडे प्रदान करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे कामाला सुरुवात होऊ शकली नाही. आता सर्व प्रकारच्या अडचणी दूर झाल्याचे सांगितले जाते. यातच ७० कोटी रूपो पुन्हा दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रदान करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे हा निधी वितरित करण्यात आला आहे. नागपूर सुधार प्रन्यास ही नोडल एजन्सी राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नासुप्रने दीक्षाभूमीच्या विकास कामासाठी निविदाही काढण्याची तयारी सुरु केली आहे. लवकरच या निविदा जारी केल्या जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार पावसाळ्यानंर दीक्षाभूमीच्या नवीन विकास आराखड्यानुसार कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली आहे.
दीक्षाभूमीच्या नवीन विकास आराखड्यानुसार राज्य सरकारकडून ७० कोटी रूपयाचा निधी गुरुवारी वितरित करण्यात आला आहे. लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
- डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग
असा होणार विकास
- मध्यवर्ती स्मारकाचे प्रवेशद्वार नवीन मोठे व कलात्मक करणे
- ११.१२ मीटर उंच अशोक स्तंभ
-ओपन थिएटर
- भव्य मुख्य गेट
- कायमस्वरुपी स्टेज
- नवीन कलात्मक सुरक्षा भिंत