दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जाच्या प्रस्तावाला गती मिळणार; नागपूरच्या विकासकामांना १५०० कोटींचे ‘बूस्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 01:37 PM2022-11-22T13:37:44+5:302022-11-22T13:39:17+5:30
पायाभूत सुविधांसाठी पुरवणी मागण्यांत तरतूद
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला व प्रलंबित प्रकरणांना गती देण्याचे निर्देश दिले. दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती द्या, असे आदेश त्यांनी दिले, तर चोखामेळा वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी त्याला १३ मजल्यांचे करावे, संत जगनाडे स्मारकाच्या वाढीव खर्चास मान्यता देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर एक मॅरेथॉन बैठक सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशिष जयस्वाल, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. टेकचंद सावरकर, आ. प्रवीण दटके, समीर मेघे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत विविध कामांचे सादरीकरण करण्यात आले. काही प्रस्तावांच्या बाबतीत निधीची मागणी करण्यात आली, तर काही बाबतीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापनासाठी साहित्य खरेदी, अग्निशमन केंद्र, मनपा टाऊन हॉल, बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन, देवडिया हॉस्पिटल, नंदग्राम प्रकल्प, नरसाळा-हुडकेश्वर मूलभूत सुविधा कामे, तसेच मलवाहिका व्यवस्थापन, आदी कामांसाठी १५०६ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. त्यासंदर्भात पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली जाईल. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय / विभागीय आयुक्त आणि तहसील कार्यालय यांचे ऐतिहासिक वारसा जतन करून नवीन उभारावयाच्या कार्यालयाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. हा प्रकल्प तत्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
चोखामेळा वसतिगृह १३ मजल्यांचे होणार
संत जगनाडे महाराजांच्या स्मारकाचा वाढीव खर्च पाहता तो तत्काळ प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, या स्मारकाच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत, या स्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
ड्रॅगन पॅलेस टेम्पललासुद्धा आवश्यक निधी देण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरसाठी २२ कोटी, शांतिवनसाठी ७.७६ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ११८ कोटी रुपये खर्च करून संत चोखामेळा वसतिगृहाचे काम करण्यात येणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून हे वसतिगृह १३ मजली करून एक हजार विद्यार्थी क्षमतेचे ते असावे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- आतापर्यंत शहरात ४९ हजार पट्टेवाटप झाले आहे. उर्वरित ४३ हजार पट्टेवाटपाच्या कामाला गती देण्याचे आदेश देण्यात आले.
- मेट्रो ताब्यात असलेला महापौर बंगला रिकामा करून तो पुन्हा उपलब्ध करून देण्यात यावा. मनपा आयुक्त बंगल्याचेसुद्धा तत्काळ हस्तांतरण करण्यात यावे.
- महापालिकेने अग्निशमन विभागाला आणखी भक्कम करावे.
- महापालिकेतील पदभरतीसाठी पुढील पावले तातडीने उचलण्यात यावीत.
- रामटेक गडमंदिर विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा.
- कोराडी विकासकामांच्या आधीच्या टप्प्यातील ६३ कोटी, पुढच्या दोन टप्प्यांसाठी २१४ कोटींची मागणी. सरकार निधी देणार.
- उमरेड रोड, कामठी रोड, अमरावती रोड येथे ट्रॅक टर्मिनल उभारणार
- एनएमआरडीएतील पदभरतीला गती देणार
- मेयो/ मेडिकल नवीन इमारतींचे प्रस्ताव : मेयोतील कामांसाठी ३०२ कोटी व मेडिकलसाठी ५९४ कोटी. तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
- नर्सेससाठी तातडीने सुविधा निर्माण करण्याच्या सूचना
- साई संस्थानने मेयोसाठी सहा कोटी रुपये दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने त्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची सूचना.
- १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय
- कोंढाळी, ग्रामीण रुग्णालय, वाडी, काटोल ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन, ग्रामीण रुग्णालय नरखेड, आदींच्या कामांना गती मिळणार.
- जिल्हा परिषदेच्या जागेवर महिला बचत गट मॉल, तीन-चार जागा तातडीने निश्चित करून त्या निर्णयासाठी सरकारकडे सादर करण्यात याव्यात.
- परमात्मा एक सेवक भवनसाठी ४५ कोटी रुपयांचा आराखडा नियोजन विभागाकडे पाठवावा.
- - लोहघोगरी टनेल प्रकल्प : पेंचच्या पाण्यात होणारी घट भरून काढण्यासाठी चिंचोली आणि हिंगणा येथे दोन उपसा सिंचन योजना, तसेच बाबदेव, माथनी, सिहोरा, बीड चिचघाट येथेसुद्धा उपसा सिंचन योजनांसाठी निधीची गरज आहे. त्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावेत.
- खिंडसी पूरक कालवा दायित्व मंजुरी, तसेच कन्हान नदी प्रकल्प, कोलार बॅरेज, आदींसाठी तातडीने मंजुरीचे प्रस्ताव सादर करावेत.