दीक्षाभूमीने घडविले आणि जगविलेही
By admin | Published: October 21, 2015 03:24 AM2015-10-21T03:24:48+5:302015-10-21T03:24:48+5:30
दीक्षाभूमी म्हणजे ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत. वर्षभर कोट्यवधी बांधव दीक्षाभूमीवर येतात. बाबासाहेबांचे तत्त्व आणि विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करतात.
नागपूर : दीक्षाभूमी म्हणजे ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत. वर्षभर कोट्यवधी बांधव दीक्षाभूमीवर येतात. बाबासाहेबांचे तत्त्व आणि विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करतात. बौद्ध बांधवांसाठी दीक्षाभूमी एक मार्गदर्शकच नव्हे तर जीवनाचा आधार ठरली आहे. रवी वैरागडे हा तरुण २१ वर्षापूर्वी दीक्षाभूमीवर आला आणि तिथेच स्थिरावला. या भूमीने त्याला जगण्याचा मार्ग दाखवत त्याला घडविले आणि जगविले.
दीक्षाभूमीवर कधीही जा उन्हात, पावसात रवी वैरागडे हा फोटोग्राफर आपला कॅमेरा घेऊन दीक्षाभूमीवर येणाऱ्यांचे फोटो काढताना दिसतो. १९९४ फुलनदेवी दीक्षाभूमीच्या दर्शनासाठी आली असता, रवी यांनी दीक्षाभूमीत तिचा पहिला फोटो काढला. दीक्षाभूमीवरील हा पहिला फोटो त्याच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला. फुलनदेवीचा फोटो काढल्यानंतर तिथे फिरत असताना, काही लोकांनी आमचाही फोटो काढण्याचा आग्रह केला. त्या मोबदल्यात पैसेही देऊ असे सांगितले. रवीने त्यांचा पत्ता लिहून घेतला आणि फोटो तयार करून, त्यांच्या पत्त्यावर पाठविला. त्यांना फोटो मिळाल्यानंतर धन्यवादाचे पत्र रवीला पाठविले. हे पत्र रवीला जगण्याचे मार्ग दाखवून गेले.
जेमतेम बारावी झालेल्या रवीने एक वर्षाचे फोटोग्राफीचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हता. फोटोग्राफीवर अपेक्षित असा रोजगारही मिळत नव्हता. त्यामुळे तो दररोज आपला कॅमेरा घेऊन दीक्षाभूमीवर बसायचा. देशाच्या कानाकोपऱ्यातून दीक्षाभूमीवर आलेल्या गोरगरीब बांधवांचे फोटो काढायचा. त्यांचे फोटो पोस्टाद्वारे पाठवायचा. हळूहळू करता हे त्याचा रोजगाराचे साधन बनले. देशाच्या कानाकोपऱ्यात रवीने काढलेले फोटो अनेकांच्या घरात पोहचले आहे. अनेकांनी फोटो मिळाल्याचे धन्यवादाचे पत्र त्याला पाठविले आहे.
(प्रतिनिधी)