दीक्षाभूमीचा होणार जागतिक विकास
By admin | Published: March 8, 2016 02:54 AM2016-03-08T02:54:52+5:302016-03-08T02:54:52+5:30
जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय अखेर राज्य शासनाने घेतला. या
नागपूर : जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय अखेर राज्य शासनाने घेतला. या निर्णयामुळे लोकमतने सुरू केलेल्या लोकलढ्यास यश आले. तसेच आंबेडकरी जनतेची मागणी मान्य झाली असून आता दीक्षाभूमीचा विकास खऱ्या अर्थाने जागतिक दर्जानुसार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मक्रांती केली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त जगाला मानवतेची शिकवण देणारी आधुनिक तक्षशीला बनली आहे. जगभरातील लोकांचा ओढा दीक्षाभूमीच्या दिशेने वाढत आहे. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे दीक्षाभूमीचा जागतिक स्तरानुसार विकास आता होऊ शकेल. शासनाने त्यादृष्टीने विकास प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश अगोदरच दिलेले आहेत. मध्यवर्ती स्मारकावरील काळवंडलेल्या डोमच्या स्वच्छतेचा मार्ग आता मोकळा होईल. कारण या डोमच्या स्वच्छतेवरच किमान नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय भव्य उद्यान, लॅण्डस्केपिंग, पार्किंग आणि शौचालय आदींचा विकास जागतिक स्तरावरच्या सुविधेनुसार होईल.
असा झाला पाठपुरावा
४आंबेडकरी जनतेचा हा सवाल योग्य होता. लोकमतनेसुद्धा आंबेडकरी जनतेचा हा विषय वृत्तमालिकेच्या स्वरूपात लावून धरला. ‘दीक्षाभूमीच्या सन्मानासाठी’ या शीर्षकांतर्गत लोकमतने चालवलेल्या वृत्त मालिकेमुळेच योग्य परिणाम झाला. आंबेडकरी संघटनांनीसुद्धा हा विषय शासन दरबारी मांडला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकमतने सुरू केलेल्या या लढ्याचे चित्र स्पष्ट पाहायला मिळाले. प्रा. जोगेंंद्र कवाडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे आदींनी ही मागणी उचलून धरली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीसुद्धा तीच मागणी होती. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचाच दर्जा मिळावा, असा एकमुखी ठराव जिल्हा नियोजन समितीने पारित करून शासनाकडे पाठविला. तत्पूर्वी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनीसुद्धा यासंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली होती. दलित मित्र संघाचे भूषण दडवे हेसुद्धा अगोदरपासूनच या मागणीसाठी प्रयत्नशील होते.
केवळ भारतालाच नव्हे तर साऱ्या जगाला अभिमान वाटावा आणि या जगातील प्रत्येक माणसाला इथे येऊन डोके टेकवावे असे मनापासून वाटते. त्या दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जा देण्याबाबत पालकमंत्री या नात्याने आपण सातत्याने पाठपुरावा केला होता आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत पुढाकार घेतला. पवित्र दीक्षाभूमीला केवळ ‘अ’ दर्जा मिळवून देणे एवढेच ध्येय नसून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ आणि संशोधन केंद्र व्हावे. एकूणच दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास व्हावा, हेच आपले स्वप्न आहे.
चंद्रशेखर बावनकुळे,
पालकमंत्री,नागपूर
दीक्षाभूमीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहेत. त्यांनी वेळोवेळी तसे जाहीरसुद्धा केले आहे. हा निर्णय सुद्धा त्याचाच परिणाम आहे. दीक्षाभूमीच्या विकासाला यामुळे गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांसह शासनाचे आभारी आहोत.
सदानंद फुलझेले
सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी