दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जाच हवा
By Admin | Published: August 26, 2015 03:06 AM2015-08-26T03:06:22+5:302015-08-26T03:06:22+5:30
राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते.
आमदारांची एकमुखी मागणी : डीपीसीत करणार मागणी
नागपूर : राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. असे असतानाही जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यास शासनाने ‘कंजुषी’ का दाखविली? असा सवाल करीत आंबेडकरी जनतेने शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असताना आता लोकप्रतिनिधींनीही दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच हवा, अशी मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अशा स्वरूपाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याची मागणी केली जाईल, असेही आमदारांनी स्पष्ट केले आहे.
भाजपचे आ. सुधाकरराव देशमुख म्हणाले, तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाला दर्जा देताना काही निकष लावले जातात. वर्षाला एक लाख लोक भेट देत असतील तर ‘क’ वर्ग, चार लाख लोक भेट देत असतील तर ‘ब’ वर्ग व त्यावर असेल तर ‘अ’ वर्ग करण्याची प्रक्रिया करावी लागते. टप्प्याटप्प्याने तसा प्रस्ताव प्रस्ताव सादर करावा लागतो. राज्य सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. दीक्षाभूमीवर एकाच दिवशी १० ते १५ लाख लोक येतात. इतर वेळीही देश-विदेशातील अनुयायी येथे भेट देतात. नागपुरातील हे एक मोठे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमध्ये सादर करून मंजूर करण्याची मागणी केली जाईल. राज्य सरकार या प्रस्तावाची दखल घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनीही ‘अ’ वर्ग देण्याचे समर्थन केले. दीक्षाभूमी, ताजबाग, टेकडी गणेश मंदिर या तिन्ही स्थळांवर लाखो लोक येतात. पर्यटन व ऐतिहासिक स्थळांच्या यादीतही यांचा समावेश आहे. दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जा देण्यात काही प्रशासकीय अडचणी असतील तर राज्य सरकारने त्या दूर कराव्यात. गरजेनुसार तरतुदींमध्ये सुधारणा करावी. दीक्षाभूमी हे देशातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे, असेही खोपडे म्हणाले. आ. सुधाकर कोहळे म्हणाले, शासनातर्फे कोणत्याही संस्थेला टप्प्याटप्प्याने वाढीव दर्जा दिला जातो. दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. राज्य सरकारने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा द्यावा. आ. डॉ. मिलिंद माने म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने दीक्षाभूमीला दर्जा देण्याबाबत विचारही केला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा देऊन दीक्षाभूमीच्या विकासाचा मार्ग खुला केला आहे. येत्या काळात सरकारतर्फे निश्चितच ‘अ’ वर्ग दर्जा दिला जाईल. आपण त्यासाठी पाठपुरावा करू.