दीक्षाभूमीला‘अ’ श्रेणीच हवी

By admin | Published: August 27, 2015 03:06 AM2015-08-27T03:06:08+5:302015-08-27T03:06:08+5:30

एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शासनातर्फे समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

Dikshitbhoomi wants an 'A' category | दीक्षाभूमीला‘अ’ श्रेणीच हवी

दीक्षाभूमीला‘अ’ श्रेणीच हवी

Next

आंबेडकरी संघटनांची मागणी : जगाला मानवतेची शिकवण दिली
नागपूर : एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शासनातर्फे समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. परंतु भारतासह जगभरातील बौद्धांची ऊर्जाभूमी व क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाणारी आणि तथागत गौतम बुद्धांचा मानवतेचा संदेश जगाला देणाऱ्या दीक्षाभूमीचे महत्त्व मात्र शासनाला कळले की नाही अशी शंका आहे. दीक्षाभूमी ही केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील बौद्धांचे केंद्र आहे. तेव्हा दीक्षाभूमीला शासन दरबारी ‘अ’ श्रेणीचाच दर्जा मिळावा, असे विविध राजकीय पक्ष व संघटनांनी स्पष्ट केले आहे.
पवित्र दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणी क्रमप्राप्त
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र दीक्षाभूमीवर ऐतिहासिक धम्मक्रांती घडवली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त जगाला मानवतेची शिकवण देणारी जागतिक कीर्तीचे श्रद्धास्थान आहे. अशा पवित्र दीक्षाभूमीला अ श्रेणी देणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
अ‍ॅड. सुलेखा कुंभारे , माजी राज्यमंत्री
१९९० पासूनची मागणी
दीक्षाभूमी हे जागतिक स्तरावरील केंद्र आहे. त्यामुळे त्याला शासनाने ‘अ’ श्रेणीचाच दर्जा देण्याची आवश्यकता आहे. १९९० साली आम्ही डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात तत्कालीन विभागीय आयुक्त एम.के. पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी केली होती. मीसुद्धा पर्यटनाच्या एका समितीवर असताना तशी शिफारस केली होती. परंतु यावर गांभीर्याने विचार झाला नाही. शासनाने आतातरी गांभीर्याने लक्ष देऊन ‘अ’ श्रेणीचा दर्जा द्यावा.
कृष्णा इंगळे , अध्यक्ष - कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

दीक्षाभूमी ही जागतिक संपत्ती
दीक्षाभूमी ही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे जागतिक महत्त्व आहे. त्याचा विकास ही शासनाची जबाबदारीच आहे. दीक्षाभूमीची तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे त्याला राज्य शासनाने कोणता दर्जा द्यावा ही मागणी गौण ठरते. दीक्षाभूमीसाठी नवीन वाद निर्माण करू नये. दीक्षाभूमीला दर्जा देऊन त्याचे महत्त्व सीमित करण्यात येऊ नये. दीक्षाभूमीसाठी काही करायचे असेलच तर भारत सरकारने त्याला जागतिक संपत्ती म्हणून घोषित करावे.
ई.झेड. खोब्रागडे , माजी सनदी अधिकारी
पावित्र्य कायम राखावे
दीक्षाभूमीचे महत्त्व हे अतिशय आगळेवेगळे आहे. ते जागतिक बौद्धांचे केंद्र आहे. त्याला ‘ब’ श्रेणीचा दर्जा देऊन शासनाने दीक्षाभूमीचा अवमान केला आहे. दीक्षाभूमीचे पावित्र्य भंग केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे देशातीलच नव्हे तर जगातील बौद्धांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. तेव्हा यासंदर्भात शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा व ‘अ’ श्रेणीचा दर्जा बहाल करून दीक्षाभूमीचे पावित्र्य कायम राखावे.
आ. प्रा. जोगेंद्र कवाडे , अध्यक्ष - पीपल्स रिपब्लिकन पाटी
दीक्षाभूमीला अ पर्यटनस्थळाच्या दर्जासाठी जनहित याचिका
नागपूर : दीक्षाभूमीला अ पर्यटन तीर्थक्षेत्र घोषित करण्यास शासनाला कोणतीही तांत्रिक अडचण नाही. त्यामुळे १७ आॅक्टोबरपर्यंत दीक्षाभूमीला अ तीर्थक्षेत्र घोषित न केल्यास तीव्र आंदोलन छेडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दीक्षाभूमीला अ पर्यटन तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी शासन निर्णय २४ आॅगस्ट २००४ नुसार प्रस्ताव व ठराव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे घोषणा करण्यात शासनापुढे कुठलीही अडचण नाही.
भूषण दडवे म्हणाले, २०१३ या वर्षी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला अ दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यास त्वरित घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रस्ताव देऊनही तो धूळ खात पडला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला ब पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी आता कुठल्याही बैठकीची गरज नसून ही मागणी पूर्ण न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला डॉ. महादेव नगराळे, योगेश वागदे, वामन कोंबाडे, वंदना वैरागडे उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)

Web Title: Dikshitbhoomi wants an 'A' category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.