दीक्षाभूमी कोविंद यांची प्रेरणाभूमी

By admin | Published: June 20, 2017 01:43 AM2017-06-20T01:43:22+5:302017-06-20T01:43:22+5:30

राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची कर्मभूमी बिहार ...

Dikshitbhumi Kovind's inspiration | दीक्षाभूमी कोविंद यांची प्रेरणाभूमी

दीक्षाभूमी कोविंद यांची प्रेरणाभूमी

Next

नागपूरशी वैचारिक नाते : बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे व्यक्तिमत्त्व
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची कर्मभूमी बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्ये असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला घडविण्यात नागपूरचादेखील मौलिक वाटा आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे कोविंद यांचे नागपूरशी भावनिक आणि वैचारिक नाते जुळले आहे. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या दीक्षाभूमीला कोविंद प्रेरणाभूमी मानतात. मागील वर्षीच्या धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्याला कोविंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते हे विशेष.
आयुष्याच्या सुरुवातीपासूनच कोविंद यांच्यावर बाबासाहेबांचा प्रभाव राहिलेला आहे. त्यांच्याच प्रेरणेतून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. विशेष म्हणजे राजकारणात आल्यानंतर त्यांनी शिक्षणाच्या विकासावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचा ‘शिका व संघटित व्हा’ हा मंत्र त्यांनी कृतीत उमटविला.
उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मौलिक कार्य केले. नागपुरात मागील वर्षी आले असताना त्यांनी याबाबत भावनादेखील व्यक्त केल्या होत्या. बिहारचे माजी राज्यपाल रा.सू.गवई यांनी शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचे काम केले होते. त्यांचेच काम मी पुढे चालवत आहे, असे त्यांनी सांगितले होते.

राष्ट्रहित सर्वोच्च
रामनाथ कोविंद हे राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेते मानले जातात. नागपुरात याचे प्रत्यंतर आले होते. दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त बोलताना रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला होता. बाबासाहेबांनी शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे कार्य केले. यालाच सर्व अनुयायांनी समोर नेण्याची गरज आहे. बाबासाहेबांप्रमाणेच सर्वांनी विविध सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारताना राष्ट्रहित सर्वोच्च मानले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले होते.
भाजपा कार्यकर्त्यांनादेखील केले होते मार्गदर्शन
रामनाथ कोविंद यांच्यासाठी नागपूर नवीन नाही. याअगोदर त्यांनी अनेकदा नागपूरला भेट दिली आहे. अगदी विधानसभा निवडणुकांच्या अगोदरदेखील ते नागपुरात आले होते.भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची आॅगस्ट २०१४ मध्ये बैठक झाली होती. यावेळी रामनाथ कोविंद यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.

Web Title: Dikshitbhumi Kovind's inspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.