दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 08:44 PM2018-10-17T20:44:02+5:302018-10-17T20:45:16+5:30

कोटी रोग्यांना देऊनी दवा, आला डॉक्टर बनूनी नवा, दिले जीवनदान मेलेल्या जीवा... अशा सोप्या शब्दातील गाण्यातून बाबासाहेबांच्या कार्यांची महत्ती गाऊन उपस्थितांच्या थेट हृदयात साद घातली जात होती. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले धम्मानंद मोरे ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत होते.

Dile jivdan melelya jiva... | दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

googlenewsNext
ठळक मुद्देअंध धम्मानंद, गंगुबाई पेरतात गाण्यातून बाबासाहेबांचे विचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोटी रोग्यांना देऊनी दवा,
आला डॉक्टर बनूनी नवा,
दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

अशा सोप्या शब्दातील गाण्यातून बाबासाहेबांच्या कार्यांची महत्ती गाऊन उपस्थितांच्या थेट हृदयात साद घातली जात होती. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले धम्मानंद मोरे ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत होते.
दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवणाऱ्या युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गावा-गावापर्यंत पोहचिवण्याचे, समाजमनात रु जविण्याचे मोलाचे कार्य आंबेडकरी जलशांच्या माध्यमामधून झाले. बाबासाहेबांचा परिवर्तनवादी विचार हा या आंबेडकरी जलशांचा प्राण आहे. हीच प्रेरणा घेत जालना जिल्ह्यातील मेठा या गावातील ६० वर्षीय शाहिर धम्मानंद मोरे आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने दीक्षाभूमीवर आले. येथील बोधीवृक्षाखाली बैठक मारली. बुद्ध वंदना घेऊन भीम गीतातून बाबासाहेबांचे विचार पेरायला सुरुवात केली. सूर-तालांच्या आविष्कारात या दोघांचे अंधत्व कुठेच आड येत नव्हते. धम्मानंद मोरे यांची ढोलकीवरील थाप थेट ऐकणाऱ्याच्या हृदयाला साद घालत होती. ‘भल्या भल्यांना माझ्या भीमानं, पहा कसं लाजवलं, भारतीय संविधान माझ्या भीमानं दिल्लीत गाजवलं’ या त्याच्या गाण्यावर तर अनेक जण थिरकलेही.
मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या पुण्याईमुळेच आज गात आहे. आम्हा दोघाना दिसत नसलेतरी ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक, विष्णू शिंदे आदींची गाणी तोंड पाठ आहे. दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवणाऱ्या युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचविताना मिळणारे समाधान मनाला श्रीमंत करते. असे म्हणत, मोरे यांनी ढोलकीवर थाप देत लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या ‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुज्या जन्मामुळे...’गाण्याला सुरुवात केली आणि त्यातच ते तल्लीन झाले.

Web Title: Dile jivdan melelya jiva...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.