दिलीप कुमार यांचे नागपूरशी हाेते आध्यात्मिक नाते ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:11+5:302021-07-08T04:08:11+5:30
रियाज अहमद नागपूर : हिंदी चित्रपट सृष्टीचे ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार यांच्या निधनाने नागपूरकरही हळहळले आहेत. त्यांचे नागपूरशी आध्यात्मिक ...
रियाज अहमद
नागपूर : हिंदी चित्रपट सृष्टीचे ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार यांच्या निधनाने नागपूरकरही हळहळले आहेत. त्यांचे नागपूरशी आध्यात्मिक नाते हाेते व पद्मभूषण माैलाना अब्दुल करीम पारेख यांच्यामुळे प्रभावित हाेते. पारेख यांच्याशी जवळचे संबंध असल्याने कुराण शरीफच्या आयत समजून घेण्यासाठी ते नेहमी नागपूरला यायचे. दिलीपकुमार काेणत्याही खासगी कामाने नागपूरला आले तरी पारेख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घ्यायचे. त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करायचे. दिवंगत अब्दुल करीम पारेख यांचे पुत्र अब्दुल मजीद पारेख यांनी दिलीप कुमार यांच्या निधनामुळे शाेक व्यक्त करीत लाेकमतशी बाेलताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
एक दिवस अब्दुल करीम पारेख यांनी दिलीप साहेबांना कुराणमधील खंड २८ च्या आयत ७६, ७७ चा अर्थ विस्तारपूर्वक समजाविला. यावर दिलीप कुमार भारावून म्हणाले, या आयतचा अर्थ पूर्ण समजल्याचे माेठे समाधान मिळाले असून या गाेष्टी जीवनात कायम लक्षात ठेवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. १९९४ साली असेच एकदा काही कामानिमित्त ते नागपूरला आले हाेते. त्यावेळी रमजान महिन्याचे राेजे सुरू हाेते. दिलीप साहेब माैलाना पारेख यांच्या घरी पाेहचले. काही वेळानंतर इफ्तारची वेळ झाली व पारेख यांनी त्यांनाही इफ्तारसाठी बसण्याचा आग्रह केला. मात्र दिलीप साहेबांनी राेजा ठेवला नसल्याचे सांगितले. साेबत इफ्तार करणार पण तुम्ही राेजादार असल्याने इफ्तार सुरू करण्याची विनंती केली. आपण ५ मिनिटांचा राेजा ठेवून इफ्तारमध्ये सहभागी हाेत असल्याचे सांगितले. अशाप्रकारे त्यांनी ५ मिनिटांचा राेजा ठेवून इफ्तार सुरू केला.
नमाज शिकवून इमामत केली
खूप कमी लाेकांना माहिती आहे की, ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार यांनी नमाज पठन करून इमामत केली आहे. १९९६ साली जेव्हा माैलाना पारेख हज यात्रेला रवाना हाेण्यापूर्वी मुंबईच्या सुहास पॅलसमध्ये थांबले हाेते, तेव्हा दिलीप साहेब त्यांना भेटायला गेले. बराच वेळ साेबत राहिल्यानंतर मगरिबच्या नमाज अदा करण्याचा वेळ झाला तेव्हा पारेख यांनी दिलीप साहेबांना नमाज पढण्याचे आवाहन केले. दिलीप साहेब विचलित झाले. धार्मिक रूहनुमांसमाेर नमाज कसा पढावा, हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी मनात वेगवेगळे विचार येत असल्याने नमाजमध्ये अडथळा येईल, अशी अडचण त्यांनी व्यक्त केली. मात्र माैलाना पारेख यांनी आग्रह करीत कुराणमधील सुरह फलक व नास वाचण्यास सांगितले. माैलाना यांनी या आयतींबाबत समजावितांना सांगितले की, या आयत म्हणजे मनुष्याला संदेश आहे, ज्यानुसार त्याने स्वत:ला त्याच्या निर्मात्यासमाेर (अल्लाह) समर्पित करावे. ज्यामुळे कुणी त्याचे वाईट करू शकणार नाही. कारण ताे निर्माता विश्वाचा एकमात्र चालक असून प्रत्येकाचे रक्षण करणारा आहे. दिलीप साहेबांना या दाेन्ही आयत पाठ हाेत्या. त्यांनी मगरीबची नमाज शिकवून इमामत करण्याचा सन्मान प्राप्त केला.