मुख्यमंत्र्यांसाठी दिली डाळ, गहू, तांदूळ भेट
By admin | Published: October 29, 2016 02:22 AM2016-10-29T02:22:58+5:302016-10-29T02:22:58+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी
महिला अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. महिला अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वातील महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी,आलू-वांगे, टमाटर आदी अन्नधान्य मुख्यमंत्र्यांसाठी भेट म्हणून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविले.
यावेळी अलका कांबळे यांनी सांगितले की, डाळ एवढी महाग झाली असल्याने आता दिवाळीला फराळासाठी चकल्या, शेव आणि इतर पदार्थ बनविणे गोरगरिबांच्या आटोक्याच्या बाहेर गेले आहे. हे भाजपचे अच्छे दिन आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कोंढाळी येथील मूर्ती गावातील खवसे परिवार तर याच महिन्यात नरखेड येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
भरघोस पाऊस पडूनही नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदभार्तील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनात शोभा भगत, लता माटे, सुषमा बाभळे, शांता हाडके, सुशीला ढाकणे, शालिनी सव्वालाखे, सूर्यकांता नाचणे, विमलताई बसेश्वर, तुळसा हिवराळे, मनीषा जेगरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)