नको त्या ठिकाणी वाहन पार्क केल्यास थेट कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 01:22 AM2021-01-19T01:22:39+5:302021-01-19T01:27:29+5:30
Direct action on vehicle , unwanted parking, nagpur news शहरात नको त्या ठिकाणी कार पार्क केल्यास वाहन मालकावर थेट कारवाई केली जाणार आहे. हे वाहन हायड्रोलिक टोइंग व्हॅनद्वारे ट्राफिक झोन कार्यालयात जमा केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात नको त्या ठिकाणी कार पार्क केल्यास वाहन मालकावर थेट कारवाई केली जाणार आहे. हे वाहन हायड्रोलिक टोइंग व्हॅनद्वारे ट्राफिक झोन कार्यालयात जमा केले जाणार आहे. यासोबतच वाट्टेल तिथे दुचाकी पार्क करणाऱ्यांनाही थेट कारवाईचा सामना करावा लागणार आहे. या वाहनांनाही लवकरच आधुनिक यंत्रणेद्वारे जप्त केले जाणार आहे. एकंदर रहदारी पोलीस शाखेचा अनधिकृत पार्किंगविरोधी चमू अत्याधुनिक होणार आहे. वास्तवात दुचाकी वाहनांना उचलण्यासाठी कुठलीच सुविधा नाही, हे विशेष.
आतापर्यंत अनधिकृत पार्किंगविरोधी चमूसाठी भाडेतत्त्वावर वाहन घेतले जात होते. यात पाच-सहा लिफ्टर सोबत असत. हे लिफ्टर चुकीच्या जागी पार्क झालेल्या दुचाकींना हाताने उचलून ट्रकमध्ये ठेवत होते. यासाठी मोठा खर्च येत होता. शिवाय, यामुळे अनेकांच्या वाहनांना नुकसान होत होते. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातही आता पुणेच्या धर्तीवर काम होणार आहे. डीसीपी, ट्राफिक ऑफिसकडून हायड्रोलिक टोइंग व्हॅन आणि पिकअप व्हॅनचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हायड्रोलिक टोइंग व्हॅन हलक्या वजनाच्या चारचाकींना उचलून घेऊन जाईल. वाहन जड असल्यास रॅम्पद्वारे चढविले जाणार आहे. शिवाय, हायड्रोलिक पिकअप व्हॅनमध्ये एक क्रेनही असेल. या क्रेनच्या पुढील भागात दोन-चार बेल्ट असतील. एक कर्मचारी टू व्हीलरच्या खालून बेल्ट बांधेल आणि लागलीच ही क्रेन खेळण्याप्रमाणे वाहनास उचलून घेईल.
अपेक्षित जॅमरही नाहीत
आधुनिकीकरणाची तयारी सुरू असलेल्या रहदारी पोलिसांकडे अपेक्षित संख्येत जॅमरही नसल्याचे दिसून येते. सर्व ट्राफिक झोनमध्ये एकूण ४० ते ५० जॅमर असल्याचे सांगितले जाते. याबाबत डीसीपी, ट्राफिक कार्यालयातील कर्मचारी बोलण्यास टाळाटाळ करतात. विभागाकडे स्पीड गन आणि अन्य उपकरणांचीसुद्धा उणीव आहे. राजस्व जमा करण्यासाठी संसाधनाची गरज आहे. ऑनलाइन चालानपेक्षा वाहन आपल्या ताब्यात घेऊन दंड वसूल करणे सोपे जात असल्याचे दिसून येत आहे.