महापौरांचे निर्देश : दीक्षाभूमी येथील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:10 PM2018-10-10T21:10:31+5:302018-10-10T21:12:22+5:30
दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो भाविक येतात. याचा विचार करता सोईसुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह दीक्षाभूमीचा दौरा केला. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, कर आकारणी व संकलन समितीचे सभापती संदीप जाधव, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो भाविक येतात. याचा विचार करता सोईसुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह दीक्षाभूमीचा दौरा केला. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, कर आकारणी व संकलन समितीचे सभापती संदीप जाधव, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
महापौरांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. परिसरात वाढलेले गवत तातडीने काढून परिसरातील कचरा व पालापाचोळा उचलण्याचे निर्देश दिले. प्रशासनाद्वारे कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, असे आश्वासन महापौरांनी स्मारक समितीला दिले.
महापालिकेतर्फे दीक्षाभूमी परिसरात २०२ पिण्याच्या पाण्याचे अस्थायी नळ लावण्यात आले आहेत. याशिवाय दीक्षाभूमी परिसरातील भागात टँकरने पाणी पुरविण्यात येणार आहे. ज्या भागात भोजनदान केले जाते, तेथे टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय परिसरातील विहिरींवर पंप बसविण्यात आले असल्याची माहिती जलप्रदाय विभागाद्वारे देण्यात आली. ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटचीही व्यवस्था करण्यात यावी. पिण्याच्या पाण्यासाठी आपात्कालीन मोबाईल क्रमांक सज्ज ठेवा, असे आदेश महापौरांनी दिले. दीक्षाभूमी परिसरात दोन अॅम्ब्युलन्सची व्यवस्था ठेवली आहे. ठिकठिकाणी डॉक्टरांच्या चमू २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली.
महानगरपालिकेच्या विद्युत विभागाद्वारे परिसरात ध्वनिप्रक्षेपक, ट्युबलाईट, फ्लड लाईटची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी दिली. अग्निशमन विभागाच्यावतीने एक गाडी परिसरात २४ तास तैनात राहणार आहे. दुसरी गाडी काचीपुरा पोलीस चौकीजवळ तैनात करण्यात आली आहे. याशिवाय सहसज्ज बुलेट मोटारसायकलही परिसरात सज्ज करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.
उपायुक्त राजेश मोहिते, रवींद्र देवतळे, डॉ. रंजना लाडे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखने, धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, डॉ.प्रदीप दासरवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे, सदस्य एन.आर.सुटे, सिद्धार्थ म्हैसकर, शिवकुमार रंगारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सफाईसाठी ५०० कर्मचारी
स्वच्छता विभागाद्वारे नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमधून प्रत्येकी ५० सफाई कामगार असे एकूण ५०० सफाई कर्मचारी हे तीन पाळींमध्ये काम करणार आहेत. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची साफसफाई केली जाणार आहे. येथे ७७० टॉयलेट, ७० स्नानगृहे उभारण्यात आलेली आहेत. ठिकठिकाणी तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आले आहे. अंबाझरी परिसरात सहा मोबाईल टॉयलेट उभारण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.