मूल्यांकन न करता थेट पुनर्मूल्यांकनाचा निकाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:50 AM2017-11-02T01:50:02+5:302017-11-02T01:50:31+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली रुळावर आली असली तरी विविध पातळीवर त्रुटी समोर येतच असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली रुळावर आली असली तरी विविध पातळीवर त्रुटी समोर येतच असतात. विधी अभ्यासक्रमातील एका विद्यार्थिनीने पुनर्मूल्यांकनाच्या प्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मूल्यांकन न करताच थेट पुनर्मूल्यांकनाचा निकाल लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांतूनदेखील ही बाब स्पष्ट होत आहे.
‘एलएलबी’च्या तृतीय सत्रातील ‘ट्रान्सफर आॅफ प्रॉपर्टीज्’ या हिवाळी २०१५ च्ये पेपरमध्ये डॉ. प्रज्ञा गिरडकर यांना ५० गुण मिळाले होते. आतापर्यंतचा शैक्षणिक ‘रेकॉर्ड’ लक्षात घेता त्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. सुमारे ६ महिने तर पुनर्मूल्यांकनाच्या निकालासाठी प्रतीक्षाच करावी लागली. अखेर ३० सप्टेंबर २०१६ रोजी त्यांचा निकाल जाहीर झाला. निकाल पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण वाढण्याऐवजी १३ गुण कमी झाले होते. विद्यापीठात परत पुनर्मूल्यांकनाची सुविधा नसल्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकारात विचारणा केली. यातदेखील त्यांना ही सुविधा नसल्याचे उत्तर मिळाले.
अखेर त्यांनी पुनर्मूल्यांकन झालेल्या उत्तरपत्रिकांची माहितीच्या अधिकारांतर्गत मागणी केली. मूळ मूल्यांकन झालेल्या उत्तरपत्रिकांसोबत त्यांनी या प्रतींची तुलना केली असता त्यांना पुनर्मूल्यांकनातील त्रुटी आढळून आल्या.
सोबतच उत्तरपत्रिकेमध्ये मूल्यांकनकर्त्याने प्रश्ननिहाय गुण नमूद केले नव्हते. त्यामुळे खरोखरच पुनर्मूल्यांकनाच्या वेळी उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
वस्तुनिष्ठ उत्तरांत बदल
या पेपरमधील पहिला प्रश्न हा वस्तुनिष्ठ होता. मूळ मूल्यांकनात त्यांना यात १० पैकी ९ गुण देण्यात आले होते. मात्र पुनर्मूल्यांकनात याचे ७ गुण झाले. मुळात वस्तुनिष्ठ प्रश्नांचे उत्तर निश्चित असते. त्यामुळे यात गुण कमी झाले, याचा अर्थ मूल्यांकनात कुठे ना कुठे त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यापीठाने ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका काढणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर विद्यापीठाने यासाठी काहीच पुढाकार घेतलेला नाही. माहिती अधिकारातदेखील याची माहिती देण्यात आलेली नाही, असे गिरडकर यांनी सांगितले.
न्यायालयात जाण्याचा मिळाला सल्ला
यासंदर्भात डॉ.गिरडकर यांनी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांची भेट घेतली. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यासमोरदेखील हा मुद्दा मांडला. एका अधिकाºयाने मूल्यांकनात त्रुटी असल्याचे मान्य केले. मात्र डॉ.श्रीकांत कोमावार यांच्या सल्ल्यावरुन थेट न्यायालयात जा, असे मला उत्तर मिळाले, असल्याचे डॉ. गिरडकर यांनी सांगितले.
परत फेरमूल्यांकनाची तरतूदच नाही
यासंदर्भात डॉ. खटी यांना विचारणा केली असता पुनर्मूल्यांकनानंतर जो काही निकाल येईल तो मान्य करणे परीक्षार्थ्यांना अनिवार्य असते. नियमांत तसे स्पष्ट म्हटलेले आहे. शिवाय पुनर्मूल्यांकनाच्या वेळी दोन मूल्यांकनकर्त्यांच्या डोळ्याखालून पेपर जातो. त्यामुळे मूल्यांकन झालेच नाही, असा दावा योग्य ठरणार नाही. आता ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्यात येते. नियमांप्रमाणे विद्यापीठाला परत पुनर्मूल्यांकन करता येणार नाही, असे डॉ.खटी यांनी स्पष्ट केले.