तंत्रज्ञानातून बदलली शेतीची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:18 PM2020-01-01T12:18:40+5:302020-01-01T12:20:31+5:30

मौद्याजवळच्या आदासा गावातील संजय प्रभूदास आतीलकर या तरुण शेतकºयाने कृषी व्यवसायाची दिशा बदलत निराशाजनक वातावरणात प्रेरणादायी वाट निर्माण केली.

Directions changed from technology to agriculture | तंत्रज्ञानातून बदलली शेतीची दिशा

तंत्रज्ञानातून बदलली शेतीची दिशा

Next
ठळक मुद्देआदासाच्या तरुण शेतकऱ्याचे पाऊलदहा एकरात घेतले ६५० टनावर मिरचीचे उत्पादन

निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, शेती आता फायद्याचा सौदा राहिलेला नाही, अशा नकारात्मक गोष्टी आपण सातत्याने ऐकतो. परंतु नकारात्मता सोडून सकारात्मक विचाराने पाऊल टाकले आणि तंत्रज्ञानाची योग्य जोड दिली तर शेतीही आयुष्याची दशा आणि दिशा बदलू शकते.
मौद्याजवळच्या आदासा गावातील संजय प्रभूदास आतीलकर या तरुण शेतकऱ्याने कृषी व्यवसायाची दिशा बदलत निराशाजनक वातावरणात प्रेरणादायी वाट निर्माण केली. या शेतकऱ्याने तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करून दहा एकराच्या शेतीत मिरचीचे ६५० टनाच्या वर उत्पादन घेण्यात यश मिळविले.
संजय आतीलकर यांचे वडील तसे सधन शेतकरी. त्यांच्याकडे १२ एकर शेती आहे. शिवाय इतरांकडूनही ठेक्याने घेत ते शेती करायचे. मात्र त्यांनी पारंपरिक शेतीशिवाय दुसरा पर्याय कधी निवडला नाही. संजय यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुलाने शेतीऐवजी नोकरी करावी, ही वडिलांची इच्छा होती. मात्र संजय यांनी केवळ वर्षभर नोकरी करून मोर्चा शेतीकडेच वळविला. वडील नाराज झाले. पण संजय यांनी विचार बदलला नाही. सुरुवातीचे तीन-चार वर्ष त्यांनीही पारंपरिक शेतीला प्राधान्य दिले. यात फार लाभ दिसत नव्हता.
अशात कृषितज्ज्ञ राहुल फुसे यांचे मार्गदर्शन संजय यांना मिळाले. संजय यांनी जळगाव येथे ड्रीप सिंचनाच्या सुविधेची माहिती जाणून घेतली होती. त्यानुसार एक प्रयोग म्हणून एक वर्ष केवळ एका एकरात ड्रीप सिंचनाच्या सोयीने मिरचीची लागवड केली. चांगले परिणाम दिसून आले. पुढल्या वर्षी तब्बल १० एकरात ड्रीप सिंचनाची सुविधा करून मिरचीची लागवड केली. साडेतीन एकरमध्ये पारंपरिक पद्धतीने मिरची लावली. हा प्रयोग यशस्वी ठरला. काही दिवसातच झाडे पाच फुटापर्यंत वाढली. पहिल्या व दुसऱ्या तोड्यात प्रमाण कमी होते, तिसऱ्या व चौथ्या तोड्यात उत्पादन प्रतिएकर ८ टनावर गेले. प्रत्येक तोड्यात ८० टनाप्रमाणे ६५० टनापेक्षा अधिक उत्पादन आणि निव्वळ नफा ३० लाखांवर म्हणजेच दुप्पट होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
थेट दिल्लीला रवाना केला माल
संजय यांच्या प्रेरणेने इतर शेतकऱ्यांनीही मिरचीचे उत्पादन सुरू केले आहे. पण ते एवढ्यावर थांबले नाही. आपला माल दलालामार्फत विक्री करण्यापेक्षा स्वत:च का पाठवू नये, हा निर्धार त्यांनी केला व दिल्लीला माल पाठविण्याचे ठरविले. मात्र त्यासाठी एकावेळी १६ ते १७ टन माल गरजेचा होता. संजय यांनी आसपासच्या शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार केले. त्यांचाही माल गोळा करून थेट दिल्लीच्या मार्केटमध्ये रवाना केला. याचवर्षी सुरू केलेला हा प्रयोगही यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरपासून मार्चपर्यंत ही निर्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Directions changed from technology to agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती