रुग्णालयातील आगीच्या घटनांसाठी संचालक जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:06+5:302021-09-02T04:16:06+5:30
नागपूर : कोरोनाकाळात राज्यात काही रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या ...
नागपूर : कोरोनाकाळात राज्यात काही रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकताच शासन निर्णय जारी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काहीजणांना प्राण गमवावे लागले. या आगी लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात असल्याने रुग्णालयातील वीजपुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी व उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिलेले आहेत.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले, रुग्णालयातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीजपुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थिएटर, आयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्य रीतीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिलेले आहेत.
रुग्णालयात अंतर्गत वीज संचमांडणीच्या सुरक्षेसोबतच अखंडित वीजपुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामूहिक जबाबदारी राहणार आहे. उच्चदाब व मध्यमदाब फिडर्सची पाहणी करणे, रुग्णालयातील वीजभार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाही, याची तपासणी करणे, केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, २०१० नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. १५ मीटरपेक्षा उंच इमारतीतील रुग्णालयांनी विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत वीज संचमांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षकांमार्फत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्याच्या एक वर्षाच्या आत प्राप्त करून घेणे बंधनकारक केले आहे. या इमारतींचे फायर ऑडिट नियमितपणे सक्षम संस्थेमार्फत करून अग्नी सुरक्षाप्रणाली प्रमाणित करावी लागणार आहे.
या सर्व बाबींचे अचूक निदान करण्याकरिता आयओटी तत्त्वावर चालणारे मायक्रो कंट्रोलर सयंत्र सर्व शासकीय व खासगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये बसविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.