नागपुरातील फूल मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य, विक्रेते व उत्पादकांचे आरोग्य संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:42 PM2020-07-10T21:42:39+5:302020-07-10T21:44:04+5:30
विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी असून मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी ठोक पुष्प विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी असून मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी ठोक पुष्प विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना केली.
लॉकडाऊनच्या काळात नेताजी मार्केटमधील फुल बाजार बंद होता. अनलॉकमध्ये सुरू झाल्यानंतर पुष्प उत्पादक शेतकरी फूल विक्रीसाठी आणत आहेत. सध्या सर्व फुलांची आवक वाढली, पण मंदिर, लग्नसमारंभ, वाढदिवस आणि विविध कार्यक्रम बंद असल्याने फुलांची विक्री कमी आहे. फुलांची विक्री न झाल्यानंतर उत्पादक माल तिथेच ठेवून निघूून जातात. अशा स्थितीत न विकलेली फुले कचराघरात फेकावी लागतात. ही नित्याचीच बाब झाली आहे. याशिवाय लगतचे दुकानदार आणि वस्तीतील लोक या ठिकाणी कचरा टाकतात. दरदिवशी कचरा मोठ्या प्रमाणात गोळा होतो. मनपाने कचरा दररोज उचलावा, अशी पुष्प विक्रेत्यांची मागणी आहे. पण त्याकडे मनपा कानाडोळा करीत असल्याचा आरोप महात्मा फुले पुष्प असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी केला.
या बाजारात गोळा होणारा कचरा आणि सिमेंट रस्त्याच्या अर्धवट कामामुळे व्यापाºयांची डोकेदुखी वाढली आहे. या भागात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात येथे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचते. कचऱ्यामुळे डास व विषारी जीवजंतूचा प्रकोप वाढला आहे. ते आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी कुणीही पुढाकार घेत नाही. घाणीच्या वातावरणात व्यवसाय करणे कठीण झाले आहे. येथे गोळा होणारा कचरा दररोज उचलावा आणि आरोग्यावर होणाºया विपरीत परिणामापासून मनपाने सुटका करावी, अशी मागणी रणनवरे यांनी केली आहे.
बाजार शताब्दीनगरात हलवावा
नेताजी मार्केटमधील पुष्प बाजार शताब्दीनगरातील तीन एकरात हलवावा. मनपाने पुष्प बाजारासाठी ही जागा निश्चित केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पण गाडी कुठे अडली हे कळायला मार्ग नाही. या संदर्भात २ एप्रिलला मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. शताब्दी बाजाराचा विकास विक्रेते करण्यास तयार आहे. पाच जिल्ह्याच्या मुख्य बाजारात सध्या ६४ अधिकृत विक्रेते कार्यरत आहे. शताब्दी नगरात बाजार नव्याने सुरू केल्यास नवीन विक्रेते पुन्हा जुळतील, शिवाय बाजाराचा व्यवसाय वाढेल, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.
शासनाने मदत करावी
लॉकडाऊनमुळे शेकडो पुष्प उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. प्रत्येक उत्पादकाला लाखो रुपयांची फुले शेतातून फेकावी लागली. आताही विक्री नगण्यच आहे. त्यामुळे दररोज आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने उत्पादकांना आर्थिक मदत करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही, असे रणनवरे यांनी सांगितले.