मोमीनपुऱ्यात गडरलाईनचे घाण पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:08 AM2021-07-29T04:08:18+5:302021-07-29T04:08:18+5:30
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : गडर लाईन जीर्ण, महापालिका प्रशासन सुस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील ...
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : गडर लाईन जीर्ण, महापालिका प्रशासन सुस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील इंग्रज काळातील विटांनी बांधलेल्या सिवरेज लाईन आता जीर्ण झाल्या आहेत. शहरातील जुन्या भागात ही समस्या आहे. यात मोमीनपुरा भागाचा समावेश आहे. गडर लाईनचे घाण पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
धरमपेठ, महाल, इतवारी, मोमीनपुरा यांसारख्या भागांत जुन्या ट्रकलाईन व गडरलाईन नादुरुस्त झाल्या आहेत. यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. साठ ते सत्तर वर्षांपूर्वीच्या ट्रक लाईन व गडर लाईन त्यावेळची लोकसंख्या विचारात घेता टाकण्यात आल्या होत्या. आता शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिवरेज व सांडपाण्यात वाढ झाली आहे. गडरलाईनवरील भार वाढल्याने व त्या जीर्ण व जागोजागी नादुरुस्त झाल्याने वस्त्यांत दूषित पाणी वाहत आहे.
मध्य नागपुरातील दाट लोकवस्तीच्या इतवारी, मोमीनपुरा भागांत गडरलाईनची गंभीर समस्या आहे. गडरलाईन दुरुस्तीसंदर्भात प्रभागातील नगरसेवकांनी सभागृहात वेळोवेळी मुद्दा उपस्थित केला. गडरलाईनच्या कामाला मंजुरी मिळाली. परंतु कंत्राटदार पुढे येत नसल्याने अजूनही समस्या कायम आहे.
....
गडरलाईनमुळे घरांना धोका
गडरलाईन लिकेज असल्याने सांडपाणी जमिनीत मुरत असल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. जुन्या इमारती पडण्याची शक्यता आहे. यामुळे जीर्ण घरांतील नागरिक दहशतीत आहेत.
...
या भागात समस्या
महाल, मोमीनपुरा, इतवारी, धरमपेठ, जागनाथ बुधवारी, जुनी मंगळवारी, टिमकी, बोरियापुरा, पाचपावली, कॉटन मार्केट, नालसाहब चौक, रामबाग, विश्वकर्मानगर, आदी भागांतही जीर्ण गडरलाईनची समस्या आहे.
....
सांडपाण्यामुळे दुर्गंधी
मोमीनपुरा भागात गडरलाईन तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पाऊस आला की अनेकांच्या घरांतही हे पाणी साचते. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
....
गडरलाईन बदलण्याची गरज
मोमीनपुरा भागातील गडरलाईन ब्रिटिशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत. सिवरेज वाहून नेण्याची क्षमता नसल्याने त्या जागोजागी तुंबल्याने रस्त्यावर व लोकांच्या घरांत सांडपाणी वाहत आहे. या संदर्भात सभागृहात वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला; परंतु अजूनही समस्या मार्गी लागली नसल्याची माहिती नगरसेवक झुल्फिकार भुट्टो यांनी दिली.