नागपुरात कोरोना क्वारंटाईन सेंटर्समध्ये दिव्यांग कायद्याची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 09:38 AM2020-09-08T09:38:02+5:302020-09-08T09:38:29+5:30
नागपूर शहरात ३५ क्वारंटाईन सेंटर्स असून प्रत्येक ठिकाणची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. या सेंटर्समध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.
उदय अंधारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेद्वारे कोरोना रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये दिव्यांग कायद्यांची पायमल्ली होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शहरात ३५ क्वारंटाईन सेंटर्स असून प्रत्येक ठिकाणची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. या सेंटर्समध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.
दिव्यांग कायद्यानुसार प्रत्येक सार्वजनिक इमारतीमध्ये रॅम्प, हॅण्डरेल्स, व्हीलचेअर्स, विशेष स्वच्छतागृहे इत्यादी सुविधा असणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये या सुविधांचा अभाव आहे. आमदार निवासाच्या देखभालीची जबाबदारी असलेले अभियंता राऊ डकर यांनी त्यांना यासंदर्भात निर्देश मिळाले नसल्याची माहिती दिली. मनपाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रत्येक झोन कार्यालयासाठी ४० व्हीलचेअर्स खरेदी करण्यात आल्या आहेत. परंतु, त्या व्हीलचेअर्स दिव्यांगांना उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. एवढेच नाही तर, दिव्यांगांना साधारण रुग्णवाहिकांमधून रुग्णालयांत व क्वारंटाईन सेंटर्समध्ये नेले जात आहे. त्याचा दिव्यांगांना प्रचंड त्रास होत आहे. व्हीलचेअरसह आत जाता येईल अशा ४ कार व १ बस नागपूरमधील अशासकीय संस्थांकडे उपलब्ध आहे. परंतु, त्यांचा उपयोग केला जात नाही. याविषयी माहिती घेण्यासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांना फोन कॉल केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
दिव्यांगांवर अन्याय
शहरात सुमारे ८००० दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यामुळे कोरोना क्वारंटाईन सेंटर्समध्ये दिव्यांग कायद्याची पायमल्ली होणे अतिशय गंभीर बाब आहे. हा दिव्यांगांवर अन्याय आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे असे दिव्यांगांच्या अधिकारासाठी लढणारे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी संचालक पिलानी अंधारे यांनी सांगितले.