दिव्यांगाचे लसीकरण केंद्र शनिवार, रविवारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:48+5:302021-07-18T04:06:48+5:30
संतापलेले दिव्यांगजन परतले घरी नागपूर : शनिवार व रविवारी दिव्यांगांचे लसीकरण केंद्र बंद असल्याने, लसीकरणासाठी केंद्रावर पोहोचलेल्या अनेक ...
संतापलेले दिव्यांगजन परतले घरी
नागपूर : शनिवार व रविवारी दिव्यांगांचे लसीकरण केंद्र बंद असल्याने, लसीकरणासाठी केंद्रावर पोहोचलेल्या अनेक दिव्यांगांना संताप व्यक्त करून परतावे लागले. सामान्यांचे लसीकरण केंद्र शनिवार, रविवार सुरू ठेवण्यात येते मग दिव्यांगांचे लसीकरण केंद्र शनिवारी आणि रविवारी बंद का, असा सवाल दिव्यांग संघटनांनी केला आहे.
नागपूर महापालिकेने दिव्यांगांसाठी शहरात स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारले. यशवंत स्टेडियम येथील सीआरसी सेंटरमध्ये लसीकरण सुरू झाले. हे दिव्यांगांचे एकमेव लसीकरण केंद्र आहे. सामान्यांच्या केंद्रामध्ये होत असलेल्या गर्दीमुळे दिव्यांगांचे लसीकरण अवघड जाते. त्यामुळे शहरात राहणारे दिव्यांगजण यशवंत स्टेडियम येथील सीआरसी सेंटरला येऊन लसीकरण करतात. शनिवार व रविवारी नोकरी करणारे दिव्यांग कर्मचारी कुटुंबासह लसीकरणासाठी येतात. सीआरसी सेंटर हे दिव्यांगांच्या आरोग्य, रोजगार, सर्वांगीण विकास व पुनर्वसनासाठी चालविण्यात येते. परंतु ह्या केंद्राला शनिवार व रविवारी सुटी असते. त्यामुळे लसीकरणही बंद असते. नोकरीपेशा दिव्यांगांना शनिवार व रविवार सोयीस्कर असल्याने हे केंद्र सुरू ठेवावे, अशी मागणी डिसेबिलिटी राईट्स अॅक्टीव्हीस्ट वर्मा तेलंग यांनी केली आहे.