विधिसंघर्षग्रस्त बालकास नाकारला जामीन

By Admin | Published: June 26, 2017 02:11 AM2017-06-26T02:11:52+5:302017-06-26T02:11:52+5:30

प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या एका विधी संघर्षग्रस्त ....

Disabled children will be denied bail | विधिसंघर्षग्रस्त बालकास नाकारला जामीन

विधिसंघर्षग्रस्त बालकास नाकारला जामीन

googlenewsNext

प्रेयसीच्या कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाने जामिनासाठी केलेले अपील अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावले.
२८ एप्रिल २०१७ रोजी बाल न्याय मंडळाने या बालकाचा जामीन अर्ज फेटाळला होता. या आदेशाविरुद्ध त्याने आपल्या वडिलामार्फत सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. या विधी संघर्षग्रस्त बालकाचे शेजारी राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला मुलीच्या घरच्यांचा सक्त विरोध होता. १० मार्च २०१७ रोजी मुलीचा बारावीचा पेपर संपल्यानंतर दोघेही पळून गेले होते.
मुलीच्या वडिलाने कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून या विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भादंविच्या ३६३, ३६६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहाकडे रवानगी केली होती. सुधारगृहातून सुटल्यानंतर पुन्हा या दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरू झाले होते.
एक दिवस हा बालक आपल्या प्रेयसीला म्हणाला होता की, आपल्या प्रेमाला तुझ्या घरच्यांचा विरोध आहे. आपल्याला सोबत राहायचे असेल तर आपण तुझ्या घरच्या सर्व लोकांना मारून टाकू आणि पळून जाऊ. त्याच्या म्हणण्यानुसार मुलीने आपल्या घरच्या लोकांना मारण्यास तयारी दर्शवली होती. विधी संघर्षग्रस्त बालकानेच योजना आखली होती. त्यानेच तिला उंदीर मारण्याचे औषध आणून दिले होते. तू हे औषध तुझ्या घरच्या भाजीत आणि काकाच्या घरच्या भाजीत टाक, असे त्याने सांगितले होते.
ठरल्यानुसार तिने उंदीर मारण्याच्या औषधाच्या पुड्या आपल्या आणि काकाच्या घरच्या भाजीत टाकल्या होत्या. जेवण केल्यानंतर सर्व जण घराच्या छतावर झोपले होते. रात्री विधी संघर्षग्रस्त बालकही प्रेयसीचे कुटुंब झोपलेल्या छतावर गेला होता. त्याने चक्क बर्फ फोडण्याच्या टोच्याने प्रेयसीच्या वडिलाच्या छातीवर वार केले होते आणि गळाही दाबला होता. सुदैवाने सारेच बचावले होते.
प्राप्त तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०७, १०९, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला ताब्यात घेतले होते.
न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील जयंत अलोणी यांनी बाजू मांडली. या प्रकरणाच्या तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक एस.डी. जायभाये आहेत.

Web Title: Disabled children will be denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.