विकारग्रस्त नागरिकांची होणार ‘ऑक्सिजन लेव्हल’ चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:46 PM2020-08-27T22:46:31+5:302020-08-27T22:48:37+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विशेषत: मधुमेह, रक्तदाब आदी विकाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे व ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब सारखे आजार आहेत त्यांच्या ‘ऑक्सिजन लेव्हल’ची चाचणी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विशेषत: मधुमेह, रक्तदाब आदी विकाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे व ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब सारखे आजार आहेत त्यांच्या ‘ऑक्सिजन लेव्हल’ची चाचणी करण्यात येणार आहे. नागपुरातील सर्व २८ पोलीस ठाण्यांमधून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता नगरसेवक आणि पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या कार्यात विविध स्वयंसेवी संस्थाही सहभागी होणार आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या संयुक्त बैठकीत गुरुवारी याबाबत निर्णय घेण्यात आला. नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मृत्यूसंख्यासुद्धा झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि रुग्णांची प्रकृती बिघडते. म्हणून रुग्णांच्या ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्यात येणार आहे. मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस कर्मचारी या मोहिमेत भाग घेणार आहेत. मनपा कर्मचारी व एन.जी.ओ.चे प्रतिनिधी पोलिसांसोबत नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहेत. ऑक्सिजन लेव्हलची तपासणी करुन नागरिकांची प्राणहानी थांबवण्यात यश येऊ शकते. शुक्रवारपासून ही मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपक्रमात सहभागी होऊन कोरोनाला हद्दपार करण्यात प्रशासनाला मदत करावी. नगरसेवकांनी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.