अपंगांचे महामंडळच झाले ‘अपंग’
By admin | Published: September 24, 2015 03:30 AM2015-09-24T03:30:34+5:302015-09-24T03:30:34+5:30
वर्षभरापूर्वी राज्यात नंबर एकवर असलेले अपंग वित्त विकास महामंडळ अधिकाऱ्यांअभावी ‘अपंग’ झाले आहे.
अपंगांचे महामंडळच झाले ‘अपंग’
नागपूर : वर्षभरापूर्वी राज्यात नंबर एकवर असलेले अपंग वित्त विकास महामंडळ अधिकाऱ्यांअभावी ‘अपंग’ झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून महामंडळाचा कारभार ठप्प पडला आहे. एकाही अपंगाच्या कर्ज प्रस्तावाला तीन महिन्यापासून मंजुरी मिळालेली नाही. विशेष म्हणजे या महामंडळाचे अध्यक्ष समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले आहेत. असे असतानाही अपंगांच्या पुनर्वसनाच्या यंत्रणेला खीळ बसत आहे.
अपंगांचा सर्वांगीण विकासासाठी अशाप्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. इतर महामंडळाच्या तुलनेत अपंग महामंडळ कार्य लक्षात घेता महामंडळ गेल्या काही वर्षात अग्रस्थानी राहिले आहे.
राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री झाल्यानंतर त्यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे यांच्याकडून महामंडळाचा कार्यभार काढून घेतला. तसेच महामंडळाचे नागपूर विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक गजानन वाघ यांना स्वीय सहायक बनवून घेतले. या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांमुळे महामंडळ अनाथ झाल्याचे चित्र आहे.
गेल्या तीन महिन्यापासून महामंडळाचे कामकाज ठप्प आहे. एकाही अपंगाच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. कर्जवसुली ठप्प पडली आहे.
महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांनी अपंगाची कर्ज प्रकरणे स्वीकारण्यास नकार दिला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहे. अपंगांचे पुनर्वसन ठप्प पडले आहे. या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे यांनी महामंडळाला खऱ्या अर्थाने विकसित केले. २००८-०९ मध्ये महामंडळाचे राज्यभरात केवळ ७४ लाभार्थी होते.
त्यांना ७६ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले होते. २००९-१० मध्ये काळे यानी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाचा कार्यभार स्विकारला. त्यांच्या काळात ७४ लाखावरून हे महामंडळ १४ कोटीवर गेले. २०१३-१४ मध्ये १२६६ लाभार्थ्यांनी महामंडळाच्या सुविधेचा लाभ घेतला. महामंडळाच्या माध्यमातून अपंगांचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन नागपुरात यशस्वीरीत्या पार पडले. (प्रतिनिधी)