यंत्र असतानाही बालरुग्ण वंचित

By admin | Published: October 28, 2016 02:55 AM2016-10-28T02:55:17+5:302016-10-28T02:55:17+5:30

हृदयरोग हा सर्वव्यापी जागतिक आजार आहे. या विकाराच्या निदानाची आवश्यक उपकरणे बहुसंख्य शासकीय रुग्णालयांत उपलब्ध आहेत.

Disadvantaged childbirth despite the equipment | यंत्र असतानाही बालरुग्ण वंचित

यंत्र असतानाही बालरुग्ण वंचित

Next

मेडिकल : आणखी एक ‘माझी’ प्रकरण
नागपूर : हृदयरोग हा सर्वव्यापी जागतिक आजार आहे. या विकाराच्या निदानाची आवश्यक उपकरणे बहुसंख्य शासकीय रुग्णालयांत उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) हृदयाचे स्पंदन टिपून चित्रीकरण करणारे ‘इको कार्डिओग्राफी’ यंत्र चालू स्थितीत आहे. परंतु याचा वापर केवळ औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉक्टरच करतात, बालरोग विभागाचे डॉक्टर थेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे पाठवितात. परिणामी, मेरसू बारसागडेसारख्या विवश बापाला आपल्या मुलाला पाठीवर बसवून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठावे लागत असल्याचे वास्तव आहे.
गडचिरोली येथे राहणारे मेरसू बारसागडे यांचा आठ वर्षांचा मुलगा आनंद बारसागडे मेडिकलच्या वॉर्ड क्र. ६ मध्ये उपचार घेत आहे. किडनीसोबतच हृदयविकाराचीही समस्या समोर आल्याने त्याला मंगळवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘इको’साठी पाठविले. परंतु तिथे घेऊन जाण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही. यामुळे आनंदला पाठीवर बसवून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व तिथून परत पाठीवर बसवून मेडिकलमध्ये यावे लागले. या वृत्ताला ‘लोकमत’ने वाचा फोडताच खळबळ उडाली. काही वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, मेडिकलच्या अतिदक्षता विभागात ‘इको कार्डिओग्राफी’ यंत्र आहे. मेडिसीनच्या डॉक्टरांनी याचे प्रशिक्षण घेतल्याने ते या यंत्राचा वापर करतात. मात्र, बालरोग तज्ज्ञांना याचे प्रशिक्षण प्राप्त नसल्याने ते ‘सुपर’मध्ये पाठवितात.
या तज्ज्ञांनाही प्रशिक्षण मिळाल्यास ‘सुपर’वरील भारही काही प्रमाणात कमी होईल. रुग्णांनाही सोयीचे ठरेल. (प्रतिनिधी)

रुग्णांच्या मदतीसाठी पाच अ‍ॅम्ब्युलन्स
रुग्णांच्या मदतीसाठी मेडिकलमध्ये तीन तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे दोन अ‍ॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) आहेत. परंतु त्यानंतरही मेरसू बारसागडेसारख्या अनेक विवश नातेवाईकावर पायपीट करण्याची किंवा पैसा खर्च करण्याची वेळ येते. यामागील कारणांचा शोध घेतला असता वॉर्डातील बहुतांश डॉक्टर याची माहिती रुग्णांना देत नसल्याचे समोर आले. रुग्णवाहिका उपलब्ध असल्याची माहिती दिली तरी ती वेळेवर मिळेल का, चालक उपस्थित राहील का याचा नेम राहत नाही. या संदर्भातील फलकही लावण्यात आले नाहीत. रुग्णवाहिकेतून रुग्णाला घेऊन गेले तरी त्याला स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर ठेवण्यासाठी तत्काळ अटेंडंट मिळत नाही. बराच वेळ वाट पाहण्यात जात असल्याचे दिसून आले.

Web Title: Disadvantaged childbirth despite the equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.