भांडणात दोघांचेही नुकसान, तरीही वाद करतातच : मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 08:17 PM2019-11-19T20:17:54+5:302019-11-19T20:20:15+5:30
आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान होईल हे कळत असतानादेखील वाद करणे सोडत नाहीत. अहंकार सोडायला लोकांना भीती वाटते, असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्याच दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षणातून व्यक्तीला विविध गोष्टींची जाण येते, परंतु त्याची अंमलबजावणी अनेकदा होताना दिसत नाही. निसर्गाला नष्ट केले तर आपणदेखील नष्ट होऊ हे सर्वांनाच माहीत असते. स्वार्थ खराब आहे हे जाणतात, पण स्वार्थ सोडू शकत नाही. त्याचप्रमाणे आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान होईल हे कळत असतानादेखील वाद करणे सोडत नाहीत. अहंकार सोडायला लोकांना भीती वाटते, असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्याच दिल्या. मंगळवारी सातव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर ‘सुपर-३०’चे संस्थापक आनंद कुमार, ‘साऊथ पॉईंट’ शाळेचे संचालक देवेन दस्तुरे प्रामुख्याने उपस्थित होते. शिक्षणप्रणालीतून विकास अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कौशल्यातून मोठी होऊ शकते. मनुष्य आपल्या विचारांनी ईश्वर किंवा राक्षस बनू शकतो. त्याच्या विचारांना दिशा देण्याचे काम शिक्षणप्रणालीतून झाले पाहिजे. अहंकारामुळे स्वामित्वाची भावना जागते. या जगात प्रत्येक गोष्टीचे प्रयोजन आहे. त्यामुळे कुणालाच क्षुल्लक लेखता कामा नये, असे डॉ.भागवत म्हणाले. यावेळी आनंद कुमार यांना ‘सर्वोत्तम नचिकेता पुरस्कार’ तर नीरु कपाई व मुक्ता चॅटर्जी यांना नचिकेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण हा एक उदात्त व्यवसाय आहे, आणि शिक्षक प्रत्येकाच्या जीवनात एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. वंचित मुलांच्या उत्कर्षासाठी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार समर्पित आहे, असे आनंदकुमार यावेळी म्हणाले. डॉ.मृणालिनी दस्तुरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ संपादक विजय फणशीकर, राजेश घई, रसिका दस्तुरे, प्रकाश सोमलवार, कांचन नायडू, डॉ.सतीश सुळे, गिरीश देवधर, डॉ.राजीव मोहता, एस. प्रभूरामन, रिता अग्रवाल, डॉ.रझिया हुसैन, आभा मेघे, माला चेम्बथ, कनिका आनंद, श्रद्धा केळापुरे, समता वासुदेवा प्रामुख्याने उपस्थित होते. रिना दर्गन यांनी संचालन केले.
वर्गखोल्यांतीलच शिक्षण सर्वकाही नाही
यावेळी डॉ. भागवत यांनी शिक्षणप्रणालीवरदेखील भाष्य केले. शिक्षणामुळे व्यक्तीचा ‘मी’पणा दूर झाला पाहिजे. मर्यादा शिकविणारी शिक्षणप्रणाली आवश्यक आहे. अनुभवांवर आधारित शिक्षण आयुष्यभर टिकते. केवळ वर्गखोल्यांतीलच शिक्षण सर्वकाही नाही. शिक्षणातून निर्भय, प्रामाणिक व आयुष्यातील खरा आनंद मिळविणारा विद्यार्थी तयार झाला पाहिजे. ही जबाबदारी शिक्षणसंस्थांची आहे, असे डॉ.भागवत म्हणाले.
सत्ताधारी चूप करतात
यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या खास शैलीत नचिकेतचे उदाहरण देत सत्ताधाऱ्यांनादेखील चिमटा काढला. वडील मुलाला व सत्ताधारी समोरच्यांना चूप करण्याचा प्रयत्न करतात, असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्याचा नेमका रोख कुणाकडे होता यासंदर्भात विविध कयास लावण्यात येत आहेत.