नागपुरात प्लास्टीकचे गायब आता स्टीलचे डस्टबिन लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:33 PM2019-11-29T22:33:46+5:302019-11-29T22:34:47+5:30
आरोग्य विभागाने इंदोरच्या धर्तीवर शहरात स्टीलचे डस्टबिन लावण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात रस्त्यालगत फुटपाथवर प्लास्टीकचे जुळे डस्टबिन लावण्यात आले होते. परंतु ते वर्षभरही टिकले नाही. प्लास्टीकचे डस्टबिन चोरीला गेले किंवा ते तुटले, याची माहिती मनपाचा आरोग्य विभाग घेत आहे. यातच आरोग्य विभागाने इंदोरच्या धर्तीवर शहरात स्टीलचे डस्टबिन लावण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. याअंतर्गत ६० लीटर क्षमतेचे ५०० नग स्टील ट्विन बिन खरेदीची योजना आहे. यावर ९७.४५ लाख रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांना प्लास्टीकचे ट्विन डस्टबिन तुटले किंवा गायब झाले याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे माहिती नव्हती. डस्टबिन चोरी झाल्याची किंवा तुटल्याचे प्रकरण आहे, याबाबत माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत निधी मिळाला आहे. याअंतर्गत स्टीलचे ट्विन बिन खरेदी केले जात आहे. इंदोरमध्ये स्टील ट्विन बिन लावण्यात आले आहेत. ते लवकर तुटत नाही. एका ट्विन बिनची किमत १९४९० रुपये आहे.
रस्त्यांची सफाई करून मजूर चऱ्याला हातठेल्याने किंवा घंटागाडीच्या माध्यमातून कलेक्शन पॉइंटपर्यंत पोहचवतात. परंतु आता हातठेला किंवा घंटागाडीचा उपयोग न करता व्हील माऊंटेड मुवेबल डस्टबिनचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आह. यात मनपा आरोग्य विभागातर्फे जो प्रस्ताव आला त्यात २४० लीटर क्षमतेचे ४ हजार व्हील माऊंटेड डस्टबिन मे नीलकमल लिमिटेडकडून खरदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
यात विभागाचे म्हणणे आहे की, नोव्हेंबर २०१७ मध्ये निविदा काढण्यात आली होती. यात नीलकमलकडून संबंधित डस्टबिन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर ८७.१२ लाख रुपये खर्च होणार आहे. स्थायी समितीने प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. परंतु निविदा पुन्हा काढण्याबाबत काहीही स्पष्ट केले नाही.