नागपुरात सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांची निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:52 AM2020-08-07T10:52:25+5:302020-08-07T10:52:58+5:30
नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या छतावर सोलर रूफ लावले. परंतु एवढी गुंतवणूक करूनही त्यांना काहीच मिळाले नाही. लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग बंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात हजारो घरांमध्ये सोलर रूफ टॉप लावण्यात आले आहेत. विजेचा खर्च कमी करण्यासाठी नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या छतावर सोलर रूफ लावले. परंतु एवढी गुंतवणूक करूनही त्यांना काहीच मिळाले नाही. लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग बंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
उल्लेखनीय म्हणजे सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांच्या घरात नेट मीटर लावण्यात येतात. त्यामुळे घरात येणाऱ्या पारंपरिक विजेची (इनपुट) आणि रूफ टॉपपासून उत्पन्न होणाऱ्या विजेची (आऊटपुट) माहिती होते. ३१ मार्चला वर्षभराचा हिशेब होतो. जर आऊटपुट अधिक असल्यास त्याची रक्कम ग्राहकांच्या खात्यात क्रेडिट करण्यात येते. परंतु यावर्षी असे झाले नाही. नागपूर शहरात रूफ टॉप लावणाऱ्यांची संख्या ३ हजार आहे. परंतु यातील बहुतांश नागरिकांचे रीडिंग घेण्यात आले नाही. जून महिन्यातही रीडिंग सुरू केल्यानंतर नेट मीटरिंगच्या ग्राहकांची मीटर रीडिंग शक्य झाली नाही. महावितरणचा दावा आहे की या वर्षी रूफ टॉपपासून उत्पादन होणाऱ्या विजेचे दर ठरलेले नाहीत. कोरोनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दर ठरल्यानंतर ग्राहकांना लाभ दिला जाऊ शकतो, असे महावितरणचे म्हणणे आहे.
सवलतही विसरले
वर्ष २०१९-२०२० मध्ये सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांना सवलत मिळाली नाही. २०२०-२१ मध्ये ही सवलत देण्यास सुरुवात झाली नाही. सन २०१८-१९ मध्ये ७७.२२ कोटी रुपये केंद्र शासनाकडून मिळाल्यानंतर आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत. मागील आर्थिक वर्षात एकूण १२३ कोटी रुपयांची सवलत अपेक्षित होती. सवलतीची जबाबदारी महाऊर्जापासून महावितरणला देण्यात आली आहे. परंतु महावितरणने त्यासाठी पोर्टलही तयार केले नाही. उल्लेखनीय म्हणजे सोलर रूफ टॉप लावणाºयांना ४० टक्के सवलत देण्याची तरतूद आहे.
रीडिंग घेण्याचे निर्देश
महावितरणचे कार्यकारी संचालक (बिलिंग अॅण्ड रेव्हेन्यू) योगेश गडकरी यांच्या मते, लॉकडाऊनमुळे बहुतांश ग्राहकांचे रीडिंग घेणे शक्य झाले नाही. आता प्रदेशातील सर्व विभागांना या महिन्यात रीडिंग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये रीडिंग घेण्याची परवानगी मागण्यात येईल. सोलर रूफ टॉपच्या ग्राहकांना पुढील बिलात लाभ देण्यात येईल.