मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 03:35 PM2022-05-11T15:35:03+5:302022-05-11T15:35:25+5:30
या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
सुरभी शिरपूरकर
नागपूर : मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
आजच्या बैठकीला वेगवेगळ्या विभागांच्या ५२ अधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे, साधनसामग्रीच्या उपलब्धतेबाबत माहिती सादर करणे, तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समिती, तसेच शोध व बचाव पथक यांचे अद्यावतीकरण करणे, तालुक्यातील पूर प्रवण क्षेत्र, गावे, रस्ते, पूल इत्यादीची माहिती तयार करणे, पूरग्रस्त गावांसाठी संपर्क अधिकारी नियुक्त करणे, धरणातील विसर्ग नद्यांची पाणीपातळी व पडणारा पाऊस यांचा अंदाज घेऊन सखल भागातील नागरिकांना स्थानिक प्रशासन पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून पूर्वसूचना देणे, याबाबतचे निर्देश देण्यात आले.
यासह पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका व नगर परिषद प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महावितरण, जिल्हा पुरवठा अधिकारी, कृषी, मेट्रो, रेल्वे, दूरसंचार, आदी विभागांना त्यांच्या संदर्भातील जबाबदारीची माहिती करून देण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम, लघु धरणाची व प्रकल्पाची पाहणी करुन गरजेनुसार दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या. पूरग्रस्त गावांचा नकाशा तयार करण्याबाबत निर्देश देण्यात आले. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे व जलाशयातून पाणी सोडल्यानंतर कोणत्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो या संदर्भात माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याबाबत बजावण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यातील महत्वाच्या पुलांचे सक्षम प्रमाणपत्र देण्याचे स्पष्ट करण्यात आले. आरोग्य विभागाने या काळात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे निर्देशित करण्यात आले. बैठकीला जिल्हाधिकारी आर. विमला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील सर्व विभाग उपस्थित होते.