आपत्ती व्यवस्थापनचे काम उधारीच्या कर्मचाऱ्यांवर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:00+5:302021-07-20T04:08:00+5:30

राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या मनपाच्या अग्निशमन विभागातील १७४ कर्मचाऱ्यांपैकी ९८ म्हणजेच ५५ ...

Disaster management work on loan staff () | आपत्ती व्यवस्थापनचे काम उधारीच्या कर्मचाऱ्यांवर ()

आपत्ती व्यवस्थापनचे काम उधारीच्या कर्मचाऱ्यांवर ()

Next

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या मनपाच्या अग्निशमन विभागातील १७४ कर्मचाऱ्यांपैकी ९८ म्हणजेच ५५ टक्के कर्मचारी दुसऱ्या विभागात कार्यरत आहेत. तर आरोग्य विभागातील ८२ कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन विभागात सेवा देत आहेत.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, फक्त २८ टक्के मनुष्यबळावर मनपाचा अग्निशमन विभाग आग-आपत्तीशी लढत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या विभागातील ५५ टक्के कर्मचारी दुसऱ्या विभागात कार्यरत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात पाठविले तर आपत्ती व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागात आरोग्य विभागाव्यतिरिक्त एलबीटीमधील ५, सामान्य प्रशासन ४, वर्कशॉप २, विद्युत विभाग २ तर जलप्रदाय व शिक्षण विभागातील प्रत्येकी १ कर्मचारी सेवा देत आहेत. काही वर्षांपूर्वी यातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परतण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु अग्निशमन विभागाने त्यांना मुक्त केले नाही. अशा परिस्थितीत अग्निशमन विभागाचे मूळ कर्मचारी ७६ आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भरतीसाठी विभाग प्रयत्न करीत आहे. प्रकरण न्यायालयातही गेले. जवळपास ४५ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. तेव्हापासून प्रकरण शांत झाले.

.....

पदांना मंजुरी, पण भरती नाही

अग्निशमन विभागातील रिक्त पदावरून काही वर्षांपूर्वी चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर १३ फायर स्टेशन विचारात घेता ८७२ पदांना मंजुरी देण्यात आली. सध्या ९ स्टेशन कार्यरत आहेत. त्यानुसार ६११ पदांची गरज आहे; परंतु यातील फक्त १७४ कर्मचारी कार्यरत असून, ४७३ पदे रिक्त आहेत. पदभरतीसंदर्भात मनपा प्रशासन व पदाधिकारी उदासीन आहेत. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना वा नैसर्गिक आपत्ती आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

......

शहरासोबतच ग्रामीणची जबाबदारी

अग्निशमन विभागात फायरमनचे काम महत्त्वाचे असते. आपत्तीचा सामना करण्याचे त्यांना प्रशिक्षण असते. परंतु मनपाकडे फक्त ४६ अग्निशामक विमोचक व ४२ प्रमुख विमोचक आहेत. अनेकदा ड्रायव्हर व ऑपरेटरला आग, आपत्तीचा सामना करावा लागतो. विभागाची परिस्थिती दयनीय आहे. अग्निशमन विभागावर शहरासोबतच ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.

...

अग्निशमन विभागात कार्यरत अन्य विभागातील कर्मचारी

विभाग पद एकूण कर्मचारी

आरोग्य सफाई मजदूर ४६

आरोग्य ऐवजदार कर्मचारी १६

आरोग्य लॉरी ड्रायव्हर १५

आरोग्य ज्येष्ठ लिपिक ०१

आरोग्य मोहरीर ०१

आरोग्य व्हॅन ड्रायव्हर ०३

वर्कशॉप ड्रायव्हर ०२

सामान्य प्रशासन ड्रायव्हर ०३

सामान्य प्रशासन कारकून ०१

जलप्रदायज्येष्ठ लिपिक ०१

विद्युत मजदूर ०२

एलबीटी ज्येष्ठ लिपिक ०१

एलबीटी लिपिक ०१

एलबीटी मोहरीर ०२

एलबीटी महसूल निरीक्षक ०१

शिक्षण अपर लिपिक ०१

कर निरीक्षक ०१

Web Title: Disaster management work on loan staff ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.