सुटी झालेल्या रुग्णांचा मेडिकल परिसरातच मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 08:46 PM2020-03-26T20:46:54+5:302020-03-26T20:48:36+5:30
उपचारानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून सुटी झाली खरी, परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ऑटोरिक्षापासून ते बससेवा बंद असल्याने घरी जायचे कसे, हा प्रश्न रुग्णांना पडला आहे. यातील सात रुग्ण बुधवारपासून रुग्णालयाच्या आवारातच थांबून होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपचारानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून सुटी झाली खरी, परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ऑटोरिक्षापासून ते बससेवा बंद असल्याने घरी जायचे कसे, हा प्रश्न रुग्णांना पडला आहे. यातील सात रुग्ण बुधवारपासून रुग्णालयाच्या आवारातच थांबून होते. मेडिकलच्या सामाजिक कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी या रुग्णांची दखल घेतली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी यांच्या परतीच्या प्रवासाची सोय होईपर्यंत रुग्णालयात पुन्हा भरती करून घेतले. मेडिकलवर ‘कोव्हीड-१९’चा भार असतानाही त्यांनी दाखविलेल्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुरेश सोमकुवर रा. काटोल, उखरडा गवाले रा. बुलडाणा, इमरतसिंग बावरी रा. भिवापूर, गजानन आवळे रा. बुलडाणा व सीमा घरडे रा. गोंदिया असे त्या रुग्णाचे नाव आहे. यातील काहींसोबत नातेवाईकही आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलिसीससाठी ‘पिस्तुला’ करण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये आले होते. मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली व बुधवारी सुटी देण्यात आली. गवाले, गजानन व सीमा या तिन्ही रुग्णांच्या डोळ्यावर मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया झाली. यांनाही बुधवारी सुटी देण्यात आली. इमरतसिंग कर्करोगाचे रुग्ण आहेत. त्यांनाही उपचारानंतर याच दिवशी सुटी देण्यात आली. परंतु ‘ब्लॉकडाऊन’मुळे रेल्वे, बससेवा बंद असल्याने घरी जायचे कसे, हा प्रश्न त्यांना पडला. कालची रात्र त्यांनी मेडिकलच्या परिसरात उघड्यावर काढली. मेडिकलच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावंडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी तातडीने या सर्व रुग्णांना भरती करून घेण्याचे निर्देश दिले. परतीच्या प्रवासाची सोय होईपर्यंत आता हे रुग्ण ज्या वॉर्डातून सुटी झाली त्या वॉर्डात भरती राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेली ही दखल आणि वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या या मदतीच्या हाताचे रुग्णांनी आभार मानले. या कार्याचे सर्वत्र कौतुकही होत आहे.