भाजीपाला विक्रेत्यांना लावली शिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:33+5:302021-04-24T04:08:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : शहरातील भाजीपाला विक्रेते दाटीदाटीने बसायचे. अरुंद जागेमुळे ग्राहकांना माेकळेपणाने फिरणे व खरेदी करणे कठीण ...

Discipline imposed on vegetable sellers | भाजीपाला विक्रेत्यांना लावली शिस्त

भाजीपाला विक्रेत्यांना लावली शिस्त

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : शहरातील भाजीपाला विक्रेते दाटीदाटीने बसायचे. अरुंद जागेमुळे ग्राहकांना माेकळेपणाने फिरणे व खरेदी करणे कठीण जायचे. त्यातच स्वच्छतेचा अभाव असल्याने सर्वांना त्रास व्हायचा. या समस्येकडे स्थानिक नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असले तरी पाेलिसांनी पुढाकार घेत संपूर्ण परिसराची साफसफाई केली. याशिवाय दुकानदारांना ओटे उपलब्ध करून देत दुकानदारांसह ग्राहकांच्या साेयीच्या दृष्टीने दुकानांचे नियाेजन करीत शिस्त लावण्याचा उपक्रम राबविला. या शिस्तीचा भंग केल्यास कारवाईचे संकेतही पाेलीस अधिकाऱ्यांनी दिले.

अतिक्रमण व इतर बाबींमुळे काटाेल शहरातील भाजी मार्केट काेंदट झाले आहे. काेराेना संक्रमणकाळात या मार्केटमध्ये फिरणे धाेकादायक वाटायचे, शिवाय विक्रेते कुठेही दुकाने थाटत असल्याने बाजारात फिरणेही कठीण झाले हाेते. या बाबी काेराेना संक्रमणास पूरक ठरणाऱ्या असल्याने ही समस्या साेडविण्याची स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. काहींनी याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहारदेखील केला. त्यामुळे पालिका प्रशासनाने दुकानदारांना ओट्यांवर दुकाने थाटण्याची सूचना केली. यात काहींचे स्थानिक राजकारण आड आले आणि ही माेहीम थंडबस्त्यात गेली. त्यातच ठाणेदार महादेव आचरेकर यांनी ही समस्या साेडविण्याचा निर्णय घेतला. पाेलीस प्रशासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने या बाजारातील ओट्यांसह संपूर्ण परिसराची साफसफाई करवून घेतली. तेथील कचऱ्याची वेळीच विल्हेवाटही लावली. त्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंगचा विचार करीत दुकानदारांना ओट्यांचे वितरण केले. त्यांना दिलेल्या जागेव्यतिरिक्त कुठेही दुकाने थाटायची नाही, अशी सूचनाही दिली. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे साेयीचे झाले आहे. दुकानदारांसह ग्राहकांनी ही शिस्त कायम ठेवावी, असे आवाहनही पाेलीस प्रशासनाने केले आहे.

ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या नेतृत्वातील या माेहिमेत पालिकेचे उपमुख्याधिकारी विजयकुमार आत्राम, अविनाश बरसे, अरविंद गजभिये, करण घिचेरिया, अजय आगे, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, लांजेवार, सुनील कोकाटे, गुलाब भालसागर यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले हाेते.

...

ओट्यांचा वापर गाेदामांसाठी

काही दुकानदार या बाजारातील दुकानांच्या ओट्यांचा वापर गाेदाम म्हणून करायचे आणि दुकाने राेडलगत थाटायचे. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली हाेती. या प्रकारामुळे बाजारात माल उतरविणे व पायी चालणे कठीण झाले हाेते. ही समस्या पाेलीस प्रशासनाने साेडविल्याने सर्वांचा फायदा झाला आहे, अशी प्रतिक्रिया डीलर मुकेश काेहळे यांनी व्यक्त केली. दुसरीकडे भाजीपाला विक्रेते ओटे साेडून आपली दुकाने थाटत असल्याने माेठी अडचण व गैरसाेय निर्माण झाली हाेती. पाेलीस प्रशासनाने ही समस्या साेडविल्याने बाजार सुटसुटीत झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजीपाला विक्रेते मिलिंद वाळके यांनी व्यक्त केली.

Web Title: Discipline imposed on vegetable sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.