शिस्त लावा, उपाययोजना करा पण लॉकडाऊन नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:06+5:302021-03-28T04:08:06+5:30
व्यापारी व सर्वसामान्यांचे मत नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यांतील परिस्थितीही बिगडत ...
व्यापारी व सर्वसामान्यांचे मत
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे.
राज्यातील इतर काही जिल्ह्यांतील परिस्थितीही बिगडत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन तर लागू होणार नाही ना, अशी शंका आहे. मागचा अनुभव लक्षात घेता कडक लॉकडाऊन नकोच, अशी एकूणच भूमिका व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची आहे. कोरोना नियंत्रणात यावा, असे सर्वांनाच वाटते, त्यासाठी लोकांना शिस्त लावा, सर्व यंत्रणा कामाला लावा, उपाययोजना करा, पण पुन्हा कडक लॉकडाऊन नको, असे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे. नागपुरात गेल्या सात दिवसांचे कडक निर्बंध व आता शिथिलतेसह निर्बंध सुरू असताना कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. यामागे, कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचे योग्य पद्धतीने होत नसलेले ‘ट्रेसिंग’, समाजात वावरत असलेले ‘होम आयसोलेशन’चे रुग्ण, दुसरी लाट येण्यापूर्वी ना झालेल्या आवश्यक उपाययोजना व सर्वात महत्त्वाचे कोरोना विषाणूचा नवीन प्रकाराबाबत बाळगलेली गुप्तता आदी कारणे दिली जात आहेत.
ट्रेसिंग व ट्रीटमेंटवर हवा भर
नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. यासाठी ट्रेसिंग व ट्रीटमेंटवर अधिक भर देण्याची गरज आहे.
डॉ. नितीन शिंदे
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ
व्यापार व व्यापारी संपतील
लॉकडाऊनमुळे लहान व्यापारी आधीच डबघाईस आला. तो पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा होत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन लागला तर व्यापारी पूर्णपणेच संपतील.
प्रभाकर देशमुख
अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन
पुन्हा गरिबांचे हाल नको
देशात लॉकडाऊन लागला तेव्हा गरबी, मजूर कष्टकरी लोकांचे मोठे हाल झाले. देशातील १२ कोटी लोकांचा राेजगार गेला. कोट्यवधी लोक देशोधडीला लागले. यात सर्वाधिक गरीब, मजूर भरडला गेला. पुन्हा ती वेळ येऊ देऊ नका.
विलास भोंगाडे, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे नेते