शोध आनंदाचा.. नव्या उन्मेषाचा

By admin | Published: January 2, 2015 12:51 AM2015-01-02T00:51:08+5:302015-01-02T00:51:08+5:30

स्वत:च्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी माणूस सातत्याने धडपडत असतो. त्या आनंदाचा शोध घेणे आणि तो साजरा करण्यासाठी कुठलेतरी निमित्त शोधणे, हा मानवी आयुष्याचा स्थायीभाव आहे.

The discovery of happiness .. | शोध आनंदाचा.. नव्या उन्मेषाचा

शोध आनंदाचा.. नव्या उन्मेषाचा

Next

नवी आशा, नवे संकल्प : सकारात्मक संकल्पात रंगला वर्षारंभ
नागपूर : स्वत:च्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी माणूस सातत्याने धडपडत असतो. त्या आनंदाचा शोध घेणे आणि तो साजरा करण्यासाठी कुठलेतरी निमित्त शोधणे, हा मानवी आयुष्याचा स्थायीभाव आहे. आनंद साजरा करण्याची संधी मिळाली तर आपण ती गमावत नाही. व्यक्तिगत आयुष्यात अपरिहार्यतेने दु:ख, वेदना भोगाव्याच लागतात, त्यांना टाळता येत नाही. या वेदनांना सामोरे जाताना त्यावर आनंदाची हळुवार फुंकर दु:खाची किनार सैल करणारी असते. दु:ख नेहमीच व्यापून उरते सकारात्मकतेने आयुष्य फुलत राहते आणि जगण्याचे बळही मिळते. एखादा आनंद व्यक्त करताना आपण दु:ख विसरतो आणि आनंदात रममाण होतो. आज नव्या वर्षाचा पहिलाच दिवस होता. नागपूरकरांनी नव्या वर्षाचे स्वागत करताना असाच आनंद व्यक्त केला, सकारात्मक संकल्प केला तर कुणी मंदिरात ईश्वराच्या आराधनेत मग्न झाले. यात युवक, महिला, शालेय मुले आणि वृद्ध व्यक्तींचाही सहभाग होता.
मुलांची रंगली चिवडा पार्टी
मुलांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस दंगामस्तीत घालविला. एरवी भातुकलीचा खेळ आता संपत चालला आहे. पण मुलांनी आईजवळ हट्ट धरला. त्यामुळे आजची सायंकाळ आपल्या मातांसह मुलांनी भातुकलीचा आनंद घेण्यात घालविली तर अनेक मुलांनी पालकांजवळ उद्यानात नेण्याचा हट्ट धरला. पण सायंकाळी थंडीचा गारठा वाढला आणि पाऊसही आला. त्यामुळे उद्यानात जाण्याचा बेत कॅन्सल करावा लागला. बच्चे कंपनीच्या शाळांना नाताळाच्या सुट्या असल्याने त्यांना वर्षाचा पहिला दिवस निवांतपणे अभ्यासाशिवाय घालविता आला. पण पालकांनी वर्षभर अभ्यास करण्याचा संकल्प त्यांना करायला लावला. त्यानंतरच घरातला टीव्ही सुरू होऊ शकला. मुलांची दुपार मात्र टीव्हीवर हतौडी आणि छोटा भीम पाहण्यात गेली. पण शाळेला सुटी असल्याने कुणी त्यांना फारसे हटकले नाही. सायंकाळी उद्यानात जाणे शक्य झाले नाही त्यामुळे अनेकांनी चिवडा पार्टी, मॅगी पार्टीचा बेत गच्चावर आखला पण पाऊस आल्याने घरातच मुलांनी पार्टी साजरी केली. काहींनी दुपारी उद्यानात खेळण्याचा आनंद घेतला. या वर्षात ‘किलर सब्जेक्ट’ असणाऱ्या इंग्रजी आणि गणित विषयावर प्रभुत्व मिळविण्याचा संकल्पही चिमुकल्यांनी एकमेकांशी केला. ऐरवी कार्टुन पाहण्यासाठी नेहमीच पालकांची ना असते. यंदा मुलानींच कार्टुन्स कमी प्रमाणात पाहून अभ्यासाकडे लक्ष देण्याचा संकल्पही स्वत:च केला.
टेकडी गणेश मंदिर आणि साई मंदिरात भाविकांची गर्दी
कुठल्याही कार्याचा प्रारंभ ईश्वराला स्मरुन करण्याची आपली परंपरा आहे. आज वर्षाचा पहिलाच दिवस ईश्वराच्या आठवाने आणि त्याच्या आशीर्वादाने सुरु करण्याचा अनेकांचा संकल्प होता. त्यामुळे शहरातील अनेक मंदिरात भाविकांची दिवसभर गर्दी होती. केवळ मंदिरच नव्हे तर गुरुद्वारा, चर्च आणि मशिदीतही भाविकांनी आपापल्या प्रार्थनापद्धतीप्रमाणे ईश्वर, अल्लाला नवे वर्ष सुख आणि आनंदात जाण्याची कामना केली. ठरविलेले कार्य आणि संकल्प सिद्धीस जावे म्हणून यावेळी ईश्वराला साकडे घालण्यात आले. आज दिवसभर प्रामुख्याने टेकडीचा गणपती, वर्धा मार्गावरील साई मंदिर, महाल येथील भुऱ्याचा गणपती, जैन दिगंबर मंदिर, श्वेतांबर मंदिरात भाविकांची गर्दी होती. घरातील ज्येष्ठांची प्रकृती चांगली राहावी, आपले संकल्प पूर्ण व्हावे म्हणून काहीनी प्रार्थना केली तर या वर्षात चांगली नोकरी मिळावी, पगारवाढ व्हावी आणि चांगला जोडीदार विवाहासाठी मिळावा, अशीही प्रार्थना युवावर्गाने यावेळी केली. याप्रसंगी आपली इच्छा पूर्ण झाल्यास ईश्वरासमोर काहींनी नवसही बोलले गेले.
शहरात सर्वच मंदिरात आज भाविकांनी गर्दी केल्याने मंदिराचे वातावरण फुलले होते. यात प्रामुख्याने टेकडी गणेश मंदिर आणि साई मंदिरात तर रात्री उशीरापर्यंत भाविकांचे आवागमन सुरु होते.
जगण्याची ऊर्जा
कुठलीही सुरुवात चांगली झाली तर त्याची अखेर यशस्वी आणि चांगली होते, अशी आपल्या संस्कृतीची मान्यता आहे. त्यामुळे वर्षाचा पहिला दिवस आनंदात गेला तर संपूर्ण वर्ष आनंदात जाईल, असा सकारात्मक भाव निर्माण होतो आणि त्याच्या परिणामाने अनेक विघ्न आपण सहजपणे पार करीत आयुष्याला सामोरे जातो. याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. त्यामुळेच प्रारंभ आनंदी करण्याची आपली परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर वर्षाचा पहिलाच दिवस नागरिकांनी आणि आबालवृद्धांनी सकारात्मक विचारांनी आणि एकमेकांना समजून घेत घालविला. सकाळची वेळ...संत ज्ञानेश्वर नासुप्र उद्यानात सारेच वृद्ध सकाळ-संध्याकाळ एकत्रित येतात. पण आज सारेच ज्येष्ठ नागरिक एका उत्साहाने भारले होते. त्यांच्या चालण्यात अन् बोलण्यात ‘चार्म’ होता. एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सारेच आनंदाच्या एका सूत्रात बांधले गेले होते. नव्या वर्षात पायी फिरणे एक किलोमीटरने वाढविण्याचा संकल्पही काहींनी केला. पण विनायकराव हल्ली दम लागतो बरं का, असे जोशींनी म्हटल्यावर विनायकराव त्यांना बळ देत होते. तुम्ही चालू तर करा...मी आहे न सोबत, असे त्यांचे बळ देणारे वाक्य काहीतरी जिद्द पेरणारे होते. शहरातील जवळपास सर्वच उद्यानात ज्येष्ठ नागरिक एकमेकांना नव्या वर्षाची अशीच ऊर्जा देताना दिसले. सायंकाळी पून्हा भेटण्याचा संकल्प मात्र आज पावसाने उधळून लावला. महिलांच्या मनातला दिवस मात्र पावित्र्याने भारलेला होता. नवे वर्ष आनंदात जावे म्हणून बहुतेक महिलांनी मंदिरात देवाचे दर्शन घेतले. शेजारच्या महिलांसोबत अनेकांनी टेकडीचा गणेश, साई मंदिर, दत्त मंदिर, महालचा भुऱ्याचा गणपती आदी मंदिरात गर्दी केली. हे वर्ष आनंदाचे आणि महागाईपासून दिलासा देणारे ठरावे, अशी प्रार्थना यावेळी महिलांनी के ली.बच्चे कंपनीचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. काल काहींनी पार्टी केली होती पण आज पून्हा बच्चे कंपनीने केक कापणे, चिवडा पार्टी करणे यासारखे उद्योग केले. प्रेमी युगलांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. उद्यानांमध्ये प्रियकर-प्रेयसीचा संवाद मोठा मजेशीर होता. प्रेयसी म्हणाली, ऐ...तू आजपासून तुझ्या रागावर कंट्रोल ठेवण्याचा संकल्प करायचा तर प्रियकर तिला दिलेल्या वेळेवरच येण्याचा संकल्प करायला बाध्य करत होता. एकूणच हा वर्षाचा पहिला दिवस साकारात्मकता पेरणारा आणि काहीतरी चांगले करण्याचा विश्वास देणारा होता.

Web Title: The discovery of happiness ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.