माढ्याच्या तिढ्यावर नागपुरात चर्चा! जानकर, गोरे, निंबाळकर, शहाजीबापूंनी घेतली फडणवीसांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:20 AM2024-04-16T09:20:37+5:302024-04-16T09:21:33+5:30
जानकर, गोरे, निंबाळकर, शहाजीबापूंनी घेतली फडणवीसांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत सुरू असलेल्या नाराजीनाट्यावर नागपुरात चर्चा करण्यात आली. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले उत्तमराव जानकर यांच्यासह भाजप नेते जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकर आणि शहाजीबापू पाटील हेदेखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांनी सविस्तर चर्चा केली. आज ज्या विषयावर चर्चा झाली ते सगळे आमच्या कार्यकर्त्यांसमोर मांडून लवकरच निर्णय घेऊ, अशी भूमिका जानकर यांनी या भेटीनंतर पत्रकारांसमोर मांडली.
महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने जानकर नाराज होते. मात्र त्यामुळे आपल्या उमेदवाराला फटका बसेल, असे भाजप नेत्यांना वाटले व फडणवीसांनी त्यांना तत्काळ नागपुरात बोलावून घेतले. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघाविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. सायंकाळनंतर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करेन. फडणवीस यांच्यासमोर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या अडचणी व भावना मांडल्या, असे जानकर यांनी सांगितले.
बारामतीवरून विमानाने...
सोमवारी सकाळीच बारामती येथून विशेष विमानाने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि उत्तम जानकर हे नागपूरला गेले. त्याठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. या बैठकीनंतर जानकर हे विमानाने पुण्यात आले. तसेच सायंकाळी ते वेळापूर या गावी बैठकीसाठी पोहोचले.
नाराज नव्हते, तोडगा निघाला
- उत्तमराव जानकर हे आमचे चांगले मित्र आहेत. ते माझ्यावर कधीच नाराज नव्हते. सातत्याने ते माझ्याशी संपर्कात होते. आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा होऊन तोडगा निघाला आहे, अशी माहिती रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली.
- भाजपबद्दल जानकर यांची काही नाराजी, अडचणी होत्या. मोहिते-पाटील यांच्यासारख्या मोठ्या राजकीय घराण्याच्या विरोधात तीस वर्षे काम केले. त्यांना मानणारे तळागाळातील लोकही नाराज आहेत. या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला.