देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत नेदरलँड कंपनीसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 07:31 PM2022-11-13T19:31:00+5:302022-11-13T19:34:02+5:30
भारतातील पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प नागपुरात
सुरभी शिरपूरकर
भारतातील पहिला नावीन्यपूर्ण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नागपूरमध्ये साकारत आहे. नेदरलँड येथील कंपनीसोबत नागपूर शहरातील घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापनासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर येथे झाली.
नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नेदरलँड येथील एसयुएसबीडीई कंपनीचे अध्यक्ष जॉप व्हीनेनबॉस, आमदार प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व अन्य अधिकाऱ्यांशी आज विस्तृत चर्चा केली. भारतात अशा पद्धतीचा हा आगळावेगळा पहिलाच प्रकल्प आहे. नागपूर येथील घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया करताना नागपूर महानगरपालिकेला यासाठी एकही पैसा मोजावा लागणार नाही. नेदरलँड येथील एसयुएसबीडीई कंपनी स्वतःच हा प्रकल्प तयार करेल. त्यावर खर्च करेल. तो उभारेल, चालवेल आणि त्याची मोफत देखभालही करणार आहे.
जगातील नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यातून अक्षय ऊर्जा निर्मिती, बायो सीएनजी, बायोगॅस, खते आणि पुनर्वापर करता येणारी उत्पादने तयार करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालबद्ध मर्यादेत हा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत एका वर्षात सुरू व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"