नागपुरात  वातावरणाच्या बदलाने वाढले आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:09 AM2019-10-27T00:09:54+5:302019-10-27T00:11:49+5:30

दिवाळीच्या धामधुमीचे वातावरण असताना काहींना मात्र दिवाळी दरम्यानच्या वातावरणीय बदलांचा फटका बसला आहे. व्हायरल ताप आणि श्वसन विकारांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे.

Disease aggravated by climate change in Nagpur | नागपुरात  वातावरणाच्या बदलाने वाढले आजार

नागपुरात  वातावरणाच्या बदलाने वाढले आजार

googlenewsNext
ठळक मुद्देव्हायरल ताप, अस्थमाच्या रुग्णांत वाढ

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या धामधुमीचे वातावरण असताना काहींना मात्र दिवाळी दरम्यानच्या वातावरणीय बदलांचा फटका बसला आहे. व्हायरल ताप आणि श्वसन विकारांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. विशेषत: अस्थामचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. पुढील काही दिवस श्वसन किंवा नाक, घसा यांच्याशी निगडित त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहे.
दिवाळीच्या तोंडावरच अचानक वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण तयार होऊन शनिवारी मुसळधार पाऊसही पडला आहे. अशा वातावरणामुळे फटाक्यांचा धूर हा वर न जाता खालीच राहतो. परिणामी, गेल्या दोन दिवसात श्वसनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले, फटाक्यांच्या धुरातून सल्फरडाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड आणि फॉस्फरस वातावरणात पसरतो. या शिवाय विविध घातक रसायनही हवेत मिसळतात. यामुळे प्रदूषणात वाढ होते. सध्या फुटत असलेले फटाके, व वातावरणात बदल झाल्याने श्वसन विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. फटाक्यांच्या धुराचा सर्वाधिक त्रास हा अस्थामाच्या रुग्णांसोबतच लहान मुले व वृद्धांना होतो. फटाक्याच्या धुराने दम लागणे, छातीत टोचणे, घशात सूज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका, जीव घाबरणे, अ‍ॅलर्जिक खोकला, छातीत खरखर होणे यासारख्या विकाराना काहींना सामोरे जावे लागत आहे.
लहान मुलांना सांभाळा
डॉ. मेश्राम म्हणाले, लहान मुलांच्या श्वसननलिका अत्यंत नाजुक असतात. त्यांना फटाक्यांच्या घातक धुरांचा अधिक धोका असतो. अनेकवेळा कायमस्वरुपी श्वसनाचा आजार जडण्याची शक्यता असते. काही प्रकरणात फटाक्यांच्या धुरामुळे अस्थम्याचा अटॅक येण्याचा धोका असतो.
फटाक्यांपासून दूर रहा
अस्थमाच्या किंवा श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी फटाक्यांपासून दूर रहावे. शक्य झाल्यास जिथे धुराचे प्रमाण कमी राहील अशा ठिकाणी जावे. घराच्या दारे-खिडक्या बंद ठेवाव्यात. नाकाला मास्क बांधावा किंवा रुमालीची डबल घडी करून बांधावी. नियमित औषधे घ्यावीत. आजार वाढल्यास किंवा अटॅक आल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे. या शिवाय, तेलकट फराळ खाऊ नये, असा सल्लाही डॉ. मेश्राम यांनी दिला.

Web Title: Disease aggravated by climate change in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.